मेयो प्रशासनाने काढले परिपत्रक : संबंधित डॉक्टरला बजावली नोटीस लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) ‘एमआर’ने कधीही यावे, कुठल्याही कक्षात शिरावे, कोणालाही भेटावे, तासनतास डॉक्टरांचा वेळ घ्यावा, हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने मांडताच याची गंभीर दखल मेयो प्रशासनाने घेतली. ‘एमआर’ला डॉक्टरांना भेटायचे असल्यास त्यांच्या विभागात भेटावे ओपीडीत नव्हे, असे परिपत्रकच काढले. सोबतच रुग्ण तपासत असताना ‘एमआर’शी संवाद साधणाऱ्या डॉक्टरला कारणे दाखवा नोटीसही बजावली. शासकीय रुग्णालयात जी औषधे उपलब्ध आहेत तीच औषधे लिहून देण्याचा नियम आहे. मात्र ‘एमआर’ डॉक्टरांनी आपल्या कंपनीचे औषधे लिहून देण्याची गळ घालण्यासाठी थेट रुग्णालयाच्या ओपीडीत गर्दी करतात. जिथे महिला रुग्ण तपासल्या जातात तिथेही शिरतात. सोमवार २२ मे रोजी ‘मेडिसीन’च्या १५ क्रमांकाच्या कक्षात डॉक्टर महिला रुग्णाची तपासणी करीत असताना १० ते १५ पुरुष ‘एमआर’ डॉक्टरांना घेराव घालून उभे होते. महिला रुग्णाला संकोचल्यासारखे होत होते. त्या परिस्थितीतही एक ‘एमआर’ आपल्या औषधांची माहिती डॉक्टरांना देत होता. याच्या बोलक्या छायाचित्रासह वृत्त ‘लोकमत’ने ‘एमआरच्या उपस्थितीत रुग्ण तपासणी’ या मथळ्याखाली मंगळवारी प्रसिद्ध केले. या वृत्ताने रुग्णालयात खळबळ उडाली. याची गंभीर दखल वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर यांनी घेतली. त्यांनी लागलीच ‘एमआर’ला ओपीडीत बंदी असल्याचे परिपत्रक काढले, शिवाय संबंधित डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस बजावली. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. मांजरेकर म्हणाल्या, मेयोमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. ‘ओपीडी’मध्ये येणारे ‘रुग्ण’ कोण व ‘एमआर’ कोण याची शहनिशा करणे सोपे नाही. ‘एमआर’ला ओपीडीत या आधीही प्रवेश बंदी होती. तसे फलकही लावण्यात आलेले आहेत. परंतु आता पुन्हा या बंदीचे परिपत्रक काढले आहे. यात ‘एमआर’ला डॉक्टरांना भेटायचे असल्यास त्यांच्या विभागात भेटावे असेही नमूद केले आहे. सुरक्षा रक्षकांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बजावलेल्या नोटीसचे संबंधित डॉक्टराने उत्तर दिले, रुग्ण तपासत असताना ‘एमआर’शी बोलत नव्हतो. ‘एमआर’ काय करत होते याकडे लक्ष नव्हते असे उत्तरात म्हटले आहे.
‘एमआर’ना ओपीडीची दारे बंद
By admin | Published: May 24, 2017 2:36 AM