गेल्या वर्षी १०७६ हृदयशस्त्रक्रिया : पोट, किडनी, मेंदू विकारांच्या रुग्णांतही वाढसुमेध वाघमारे नागपूरदेशात हृदय, मेंदू व किडनीचे विकार वाढत आहे. याचा भार सुपर स्पेशालिटी रुग्णालयावरही पडला आहे. २०१३ मध्ये या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) ३५४१५ नव्या रुग्णांनी उपचार घेतले तर २०१४ मध्ये यात १०८५१ रुग्णांची भर पडून ही संख्या ४६२६६वर पोहचली आहे. सर्वात जास्त रुग्ण हे हृदयविकाराचे आहेत. त्या खालोखाल पोट, किडनी व मेंदूविकाराचे रुग्ण आहेत. राज्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या तुलनेत नागपुरातील या रुग्णालयांची ओपीडी सर्वात जास्त आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेले हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय १९९८पासून रुग्णसेवेत आहे. सध्या हृदयशल्य चिकित्साशास्त्र, (सीव्हीटीएस), हृदयरोग (कार्डिओलॉजी), मेंदूरोग (न्यूरोलॉजी), मज्जातंतूची शल्यक्रिया (न्यूरोसर्जरी), किडनीविकार (नेफ्रालॉजी), मूत्रपिंडरोग (युरोलॉजी) व पोटाचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी) अशा सात विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. गेल्या दोन वर्षांची रुग्णांची आकडेवारी पाहता या सातही विभागात रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: २०१३ मध्ये कार्डिओलॉजी विभागाच्या ओपीडीमध्ये १९१३९ रुग्ण तर २०१४ मध्ये १५९५७ नव्या रुग्णांची भर पडली. २०१३ मध्ये गॅस्ट्रोएन्ट्रालॉजीच्या ओपीडीमध्ये १०६३१ तर २०१४मध्ये १०८०५ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. विशेष म्हणजे आठवड्यातून केवळ दोन किंवा तीनच दिवस ओपीडी राहत असतानाही रुग्णसंख्या वाढत आहे. या रुग्णालयात विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीगड येथून रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्ण वाढत असतानाही येथे वरिष्ठ निवासी डॉक्टर नाहीत. सायंकाळी ६ वाजल्यानंतर बहुसंख्य रुग्ण परिचारिकेच्या उपचारांवर अवलंबून असल्याचे धक्कादायक चित्र आहे.वाढत्या रुग्णांसोबतच आवश्यक पदे भरणे गरजेचेसुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपलब्ध वैद्यकीय सेवेमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णसेवेच्या तुलनेत केवळ ३६७ पदेच मंजूर आहेत. सध्याच्या स्थितीत ७५८ पदांची आवश्यकता आहे. या पदांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला पाठविला असून पाठपुरावा घेण्यात येत आहे.- डॉ. मनिष श्रीगिरीवारविशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी रुग्णालय. ४५९ न्यूरोसर्जरी तर २८३२ रुग्णांवर एन्डोस्कोपी२०१३ मध्ये ४३८ तर २०१४ मध्ये ४५९ रुग्णांवर न्यूरोसर्जरी करण्यात आली. गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात २०१३ मध्ये २६२२ तर २०१४ मध्ये २८३२ रुग्णांवर एन्डोस्कोपी करण्यात आली. विशेष म्हणजे या विभागात २०१३ मध्ये १०६३१ तर २०१४ मध्ये १०८०५ नव्या रुग्णांनी उपचार घेतले.
ओपीडी ‘सुपर’, १० हजाराने वाढ
By admin | Published: July 20, 2015 3:06 AM