नागपूर : पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाकरिता नोंदणी करीत असताना विद्यार्थ्यांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासह अकॅडमीक क्रेडिट खाते देखील उघडता येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हा उपक्रम राबवित विद्यार्थ्यांकरीता ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रथम वर्ष प्रवेशाकरिता नोंदणी प्रक्रिया गुरुवार, दिनांक १५ जून २०२३ पासून सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अव्यावसायिक महाविद्यालयांमध्ये पदवी प्रथम वर्षाला प्रवेश घेण्याकरिता कार्यक्रम घोषित केला आहे. अव्यावसायिक महाविद्यालयातील पदवी (यूजी) स्तरावरील अभ्यासक्रमात प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वप्रथम नोंदणी करावी लागणार आहे. मात्र, ही नोंदणी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविणे गरजेचे आहे. नाव नोंदणी करण्याचा अर्ज भरीत अपलोड करणे गरजेचे आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदविले असल्यास त्याचे कागदपत्र यावेळी अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर अकॅडमीक बँक ऑफ क्रेडिट अकाउंट (एबीसी)चे खाते उघडावे लागणार आहे. मतदार नोंदणी आणि अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट अकाउंट तयार केल्यानंतर प्रवेशाकरिता नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल. विद्यापीठाच्या www.nagpuruniversity.ac.in संकेतस्थळावर याबाबत माहिती उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुरुवार, दिनांक १५ जून २०२३ ते ३ जुलै २०२३ पर्यंत विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल. विद्यार्थ्यांनी नोंदणी करीत सर्व कागदपत्रे अपलोड करावयाचे आहे. त्यानंतर झालेल्या नोंदणीची प्रिंट आऊट घेऊन संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अडचणी आल्यास ८४५९३४३८७८, ७९७२०५४९८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे व उपकुलसचिव (महाविद्यालय विभाग) डॉ. रमण मदने यांनी केले आहे.
२५ महाविद्यालयांची संलग्नता गोठविली अकॅडमीक ऑडिट प्रपोजल सादर न केल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परिक्षेत्रातील सद्यस्थितीत २५ महाविद्यालयांची संलग्नता गोठविली आहे. पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेताना या २५ महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज सादर न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. संबंधित २५ महाविद्यालयांच्या नावांची यादी प्रवेश नोंदणी करणाऱ्या वेब पोर्टलवर देण्यात आली आहे. अकॅडमीक ऑडिट प्रपोजल सादर न केल्याने आणखी काही महाविद्यालयांची संलग्नता गोठविली जावू शकते. त्यामुळे अशा महाविद्यालयांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय विद्यापीठाची संलग्नता कायम असलेल्या महाविद्यालयांची यादी देखील विद्यार्थ्यांकरीता त्याच ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे.
गुणवत्ता यादी महाविद्यालयात
१५ जून २०२३ ते ५ जुलै २०२३ पर्यंत महाविद्यालयात प्रवेश अर्जासोबत नोंदणीची प्रत सादर करावयाची आहे. महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर विद्यापीठाने दिलेल्या एकरूप वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवून गुणवत्ता यादी तयार करीत प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे प्रवेश विद्यापीठाच्या वेबपोर्टलवर नोंदणी करून कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.