नागपूर : धंतोलीतील विवेकानंद नगरात दोन गटातील वादात एका युवकाने पिस्तुलातून गोळीबार केला. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेचा दोन दिवस उशिराने म्हणजे बुधवारी खुलासा झाला. या घटनेमुळे शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी यश राजकुमार शर्मा याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
यश शर्मा एका राजकीय संघटनेशी निगडित आहे. तो मारहाण आणि गुन्हेगारी घटनांमुळे आधीही चर्चेत होता. यशचा काही दिवसांपासून नंदनवन येथील रहिवासी आनंद ठाकूरसोबत वाद सुरू आहे. दोघे पूर्वी मित्र होते; परंतु त्यांच्यात वाद विकोपाला गेल्यामुळे ते एकमेकांना नुकसान पोहोचविण्याच्या तयारीत होते. रविवारी रात्री आनंद आपला मित्र प्रिन्स आणि इतर साथीदारांसोबत यशच्या विवेकानंदनगर येथील कार्यालयात गेले. यशही आपल्या साथीदारांसोबत कार्यालयाच्या बाहेर आला. तेथे दोन्ही गटात मारहाण झाली. दरम्यान यशने पिस्तुलातून आनंदच्या दिशेने गोळी चालविली. अंतर अधिक असल्यामुळे आनंद बचावला. आनंदने धंतोली ठाण्यात पोहोचून यशने गोळीबार केल्याची माहिती दिली. धंतोली पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांना गोळीबार झाल्याचा पुरावा मिळाला नाही. त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यानंतर आनंदच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून दोन्ही गटांविरुद्ध मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या भूमिकेमुळे संतप्त आनंद ठाकूरने बुधवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे घटनेची तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांना प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी रात्री उशिरा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून यश शर्माला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, यश शर्मा आपण एअर गनने फायर केल्याचे सांगत आहे.
पोलीस निरीक्षकांना हटविले
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन धंतोलीचे निरीक्षक महेश चव्हाण तसेच दुय्यम निरीक्षक मडावी यांना तत्काळ प्रभावाने नियंत्रण कक्षात हलविले. पोलीस आयुक्तांनी तपासात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच वाठोडा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर यांनाही एका प्रकरणात नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे. आगरकर आपल्या कार्यशैलीमुळे आधीही चर्चेत होते. त्यांचा कार्यकाळ झोन ४ अंतर्गत येणाऱ्या ठाण्यांमध्ये गेला. या कारवाईमुळे ठाणेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.