लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरणादरम्यान राेडलगत दाेन्ही बाजूंनी नालीचे बांधकाम करण्यात आले. काही ठिकाणी या नाल्या उघड्या असल्याने धाेकादायक ठरत आहेत. भाजीपाला खरेदी करताना एक व्यक्ती या उघड्या नालीत पडल्याने किरकाेळ जखमी झाली. ही घटना देवलापार (ता. रामटेक) येथे रविवारी (दि. २०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
या महामार्गासाेबतच नालीचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. देवलापार येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ ही नाली बुजल्याने पाण्याची दुर्गंधी येत असल्याची तक्रार दिनेश शंकरपुरे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली हाेती. त्यामुळे ही बाब ग्रामपंचायतने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिली हाेती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतने जेसीबीच्या मदतीने नालीवरील झाकण बाजूला करून ती साफ केली. त्यानंतर ती नाली उघडीच ठेवण्यात आली.
त्या ठिकाणी टिनपत्र्यांनी नाली झाकण्यात आली असून, शेजारी भाजीपाला विक्रेत्याने दुकान थाटले. एक व्यक्ती एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जात असताना त्यांचा पाय टिनपत्र्यावर पडला आणि ती व्यक्ती टिनपत्र्यासह नालीत काेसळली. ती व्यक्ती एसटी महामंडळाचा कर्मचारी असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यामुळे संभाव्य धाेका टाळण्यासाठी ही नाली पूर्ववत झाकण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
...
रविवारी घडलेली घटना ही दुर्दैवी हाेती. या नालीची साफसफाई राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूचनेनुसार करण्यात आली. त्यासाठी गरज भासल्यास झाकण ताेडा, आमच्याकडे झाकणं आहेत, असेही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले हाेते. झाकण ताेडल्यानंतर प्राधिकरणाने अद्यापही झाकण दिले नाही.
- शाहिस्ता पठाण,
सरपंच, देवलापार.