लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिसरी लाट येण्यापूर्वी नागरिकांना कोराडी वीज केंद्रातून ऑक्सिजन उपलब्ध झाले पाहिजे यादृष्टीने युद्धपातळीवर काम सरा, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गुरुवारी वीज अधिकाऱ्यांना दिले.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने महानिर्मितीने मिशन ऑक्सिजन मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ३ बाय ६६० मेगावॉट क्षमतेच्या कोराडी वीज केंद्रातील ऑक्सिजन प्लांट आणि पावसाळ्याच्या पार्शवभूमीवर वीज उत्पादन अधिक सुरळीत राहावे सोबतच कोविड काळात नागरिकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा या दृष्टीने ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गुरुवारी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा दौरा केला.
प्रारंभी त्यांनी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या मॉडेलची (प्रतिकृती) पाहणी करुन नियंत्रण कक्षातील अभियंत्यांशी संवाद साधला आणि बैठकीत तांत्रिक बाबींचा आढावा घेतला. कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी संगणकीय सादरीकरणातून वीज केंद्राची माहिती दिली.
महानिर्मितीच्या सांघिक सामाजिक जबाबदारीअंतर्गत महानिर्मिती आणि दत्ता मेघे मेडिकल कॉलेज ॲड. शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित दवाखाना येथे भेट देऊन त्यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी केली.
दौऱ्यात मुख्य अभियंता राजकुमार तासकर, अनिल आष्टीकर, राजेंद्र राऊत, उपमुख्य अभियंता सुनील सोनपेठकर तसेच वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.