नागपूर : ऑपरेशन प्रवासी सुरक्षेअंतर्गत रेल्वे पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे छत्तीसगडमधील एक सराईत चोरटा गजाआड झाला. राहुल कमलनारायण साहू (वय २९) असे त्याचे नाव आहे. तो छत्तीसगडमधील रहिवासी आहे.
६ सप्टेंबरला पहाटे ३ च्या सुमारास नागपूर स्थानकावर असलेल्या प्रवीण सुरेशराव भगत यांचे पॉकिट तसेच मोबाईल आणि पर्स चोरट्याने लंपास केले. लक्षात येताच प्रवीण यांनी फलाट क्रमांक ८ वर असलेले रेल्वे पोलीस कर्मचारी योगेश हडकने यांना सांगितले. योगेश यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांना माहिती दिली.
चोरट्याचा शोध लावण्यासाठी योगेश यांनी त्यांचे सहकारी हवलदार नितिन देवर तसेच कुंदन फूटाने आणि नीरज कुमार यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात प्रवीण यांचा मोबाईल चोरणारा दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीने आरोपीचा माग काढून त्याला काही वेळेतच फलाट क्रमांक एकवर पकडले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ प्रवीणचा २४ हजार किंमतीचा मोबाईल तसेच पाकिटमधील चोरलेले साडेचार हजार रुपये आढळले. त्याने या चोरीसह अन्य एका मोबाईल चोरीचीही कबुली दिली.
गोंदियातही गुन्हा दाखल
त्याला अटक करून विचारपूस केली असता त्याने अशाच प्रकारे दुसरा एक मोबाईल चोरल्याचे कबुल केले. शिवाय त्याच्याविरुद्ध गोंदियातही गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले.