नागपूर : अमली पदार्थांची तस्करी वाढत असल्याचे चित्र असताना नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत जवळपास एक हजार ५५५ किलो गांजा जप्त केला. ओडिशाहून बीडकडे निघालेल्या एका ट्रकला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे सेंद्रिय खतांच्या आड गांजाची तस्करी करण्यात येत होती. या प्रकरणात नागपुरातून ट्रकचालक तर बीडमधून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखा व एनडीपीएसच्या पथकाने ही कारवाई केली.
ओडिशाहून नागपूरमार्गे गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होणार असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा व एनडीपीएसचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने कापसी परिसरात जय भोले ढाब्यासमोर सापळा रचला व पहाटे एपी१६-एटी-७३४९ या ट्रकला थांबवून त्याची ’केनाईन डॉग’च्या मदतीने झडती घेतली. त्यात मागील भागात सेंद्रिय खतांची पोती होती. मात्र त्याच्या मागे गांजाची ५० हून अधिक पोती भरली होती व गांजाची किंमत २ कोटी ३३ लाख २९ हजार इतकी आहे. पोलिसांनी लगेच ट्रकचालक सोमेश्वरराव ऊर्फ बुज्जी कोटीपिल्लम (५०, राजमंडरी, आंध्रप्रदेश) व त्याचा सहकारी बलेमनानाजी ऊर्फ नानी पैदयकापु बलेमा (२५, राजमंडरी, आंध्रप्रदेश) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी माल बीडला चालला असल्याची माहिती दिली. चालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांनी बीडच्या पोलिसांना सूचना केली व ज्यांच्याकडे हा साठा जाणार होता त्या दोघांना तेथील पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी गांजासह ट्रक, दोन मोबाईल, खतांची २७६ पोती, रोख रक्कम असा एकूण २ कोटी ४३ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अप्पर पोलीस आयुक्त
गुन्हे नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप पखाले, सहायक पोलीस आयुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज सिडाम, शुभांगी देशमुख, सायबर सेलचे बलराम झाडोकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शिर्डीच्या ‘कनेक्शन’चादेखील शोध
पोलिसांनी केलेल्या तपासणीत खतांची ‘बिल्टी’ही शिर्डीच्या पत्त्याची होती. मात्र माल हा बीडला चालला होता. या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे की यामागे आणखी मोठे रॅकेट आहे याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. शिर्डी व बीडकडे पथके रवाना करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
मराठवाड्यात होणार होता पुरवठा?
गांजाचा इतका मोठा साठा पाहून पोलिसांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला. इतका गांजा निश्चितच बीडमध्ये वापरला जाणार नव्हता. तर तो तिथून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवला जाणार होता का या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.