लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने रोडवरील खड्ड्यांची गंभीर दखल घेतली असून या समस्येचा येत्या काही महिन्यांत सोक्षमोक्ष लावला जाण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या खड्ड्यांवरील तक्रारी स्वीकारण्यासाठी न्यायालयाच्या आदेशावरून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव कुणाल जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.मुंबई उच्च न्यायालयात रोडवरील खड्ड्यांसंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्याप्रकरणात न्यायालयाने नागरिकांच्या खड्ड्यांवरील तक्रारी स्वीकारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नियुक्त करण्याचा आदेश दिला होता. नागरिकांच्या तक्रारींना न्याय मिळावा व ही समस्या कायमची निकाली निघावी यासाठी हा उपाय करण्यात आला आहे. कुणाल जाधव हे नागपूर जिल्ह्यातील खराब रोड व रोडवरील खड्ड्यांसंदर्भातील तक्रारी स्वीकारतील. त्यानंतर तक्रारी योग्य कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाºयांकडे पाठविण्यात येतील. त्या तक्रारींची दखल घेण्यात आली किंवा नाही याची योग्यवेळी माहिती घेतली जाईल. प्रत्येक तक्रारीचा हिशेब ठेवून पुढील आदेश मिळेल त्यावेळी एकत्रित अहवाल उच्च न्यायालयाला सादर करण्यात येईल. नागरिकांना स्वत:, ई-मेल किंवा टपालाद्वारे तक्रार पाठविता येईल. सचिव कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर, सहावा माळा, जिल्हा न्यायालय येथे तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत अशी माहिती जाधव यांनी दिली.
हायकोर्टाचे आॅपरेशन खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 1:01 AM
मुंबई उच्च न्यायालयाने रोडवरील खड्ड्यांची गंभीर दखल घेतली असून या समस्येचा येत्या काही महिन्यांत सोक्षमोक्ष लावला जाण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देतक्रारी करण्याचे आवाहन : जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त