लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या आॅपरेशन ‘मुस्कान’ ’अंतर्गत २०११२ बालके शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ज्या भागात अल्पवयीन मुली आहेत, विशेषत: झोपडपट्टी भागांमध्ये जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, सन २०१४ ते २०१६ या कालावधीत ३२५९८ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. यात सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यापैकी २९५०५ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. या कालावधीत १६ ते २५ वयोगटातील १६२८१ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या, त्यातील १४१४१ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. हरवलेल्या व्यक्ती सापडण्यासाठी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात प्रमाण कार्यपद्धती (एसओपी) ठरविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १८ वर्षांखालील हरविलेल्या लहान मुलांच्या बाबतीत तक्रार दाखल होताच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. चार महिन्याच्या आत हरविलेले मूल सापडले नाही तर त्याबाबतचा तपास अनैतिक मानवी वाहतूक माहिती कक्षामार्फत करण्यात येतो. मुंबईतील सर्व परिमंडळात असे कक्ष स्थापन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच बृहन्मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात बीट पेट्रोलिंग तसेच पोलीस ठाणे हद्दीत मोहल्ला कमिटी यांची सभा घेऊन त्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातात व अनोळखी व्यक्ती मिळाल्यास पोलीस ठाण्यास कळवावे असे सांगितले जाते.यावेळी झालेल्या चर्चेत राजेंद्र पाटणी, प्रताप सरनाईक, भारती लव्हेकर यांनी भाग घेतला.बालक शोधण्यासाठी पालकांचे वाहनयावेळी सदस्यांनी बेपत्ता बालक शोधण्यासाठी पोलीस पालकांनाच वाहनाची व्यवस्था करायला लावत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा गृहराज्यमंत्री पाटील यांनी ही बाब अतिशय गंभीर असून यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्यात येतील, असे स्पष्ट केले.