नरेश डोंगरे
नागपूर : रेल्वे प्रवासात सहजपणे स्फोटके अन् प्रतिबंधित पदार्थाची तस्करी होत असल्याचे लक्षात आल्याने संभाव्य घातपाताचा धोका रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून नागपूरसह विविध रेल्वेस्थानकांवर ‘ऑपरेशन सरप्राईज’ राबविले जात आहे. नागपूर आणि पुण्याच्या रेल्वेस्थानकावर आढळलेल्या डिटोनेटर्स, जिलेटिन आणि फटाक्यांच्या पार्श्वभूमीवर हे ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
रेल्वेतून मोठ्या प्रमाणात सोने-चांदीच्या दागिन्यांची तस्करी होते. तेलंगणा, ओडिशा, झारखंडमधील गांजा तस्करांचे तर रेल्वेला प्रथम प्राधान्य असते. पिशवी, बॅगमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा भरून परप्रांतातील तस्कर नेहमीच नागपूर, चंद्रपूर, बल्लारपूरसह विविध शहरात गांजाची खेप आणतात. येथून हा गांजा नंतर वेगवेगळ्या प्रांतात अन् शहरात नेला जातो. नागपुरात वेळोवेळी मोठ्या प्रमाणात गांजा पकडला जातो. तरीसुद्धा गांजाची तस्करी थांबलेली नाही.
अलीकडे अत्यंत महागडे अन् तीव्र नशा देणाऱ्या मेफेड्रॉन (एमडी)चीसुद्धा रेल्वेतून तस्करी केली जाते. हे कमी की काय, ९ मे रोजी नागपुरात आणि १३ मे रोजी पुण्याच्या रेल्वेस्थानक परिसरात अनुक्रमे डिटोनेटर्स, जिलेटिन आणि बारूदच्या (फटाक्याच्या) पुंगळ्या आढळल्या. त्यामुळे स्फोटकांचीही तस्करी रेल्वेने होत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे त्याची सुरक्षा यंत्रणांकडून अत्यंत गंभीरपणे दखल घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, जीआरपी (रेल्वे पोलीस), आरपीएफ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स)च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना मदतीला घेऊन संयुक्तपणे वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांवर ‘ऑपरेशन सरप्राईज’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
असे स्वरूप, असा फायदा
स्थानकावर ज्यावेळी सर्वात जास्त रेल्वेगाड्या येतात, त्या एक-दोन तासात जीआरपी, आरपीएफ अचानक रेल्वेस्थानकावर तपासणी सुरू करतील. एकाच वेळी ठिकठिकाणी तपासणी होत असल्याने स्फोटके अथवा अन्य प्रतिबंधित चीजवस्तू तसेच अमली पदार्थांची तस्करी करणारे पकडले जातील. त्यामुळे घातपाताचा धोका टळेल. समाजकंटकांचे मनसुबे उधळले जाऊन रेल्वेमार्गे होणाऱ्या तस्करीला आळा बसेल.
अनेक ठिकाणी झाली रिहर्सल
अचानक तपासणी (सरप्राईज चेकिंग) होणार असल्यामुळे हवालावाल्यांची मोठी रोकड किंवा सोने जीआरपीच्या हाती लागू शकते. दरम्यान, नागपुरात दोन दिवसांपासून सरप्राईज चेकिंग सुरू झाली आहे. तर, खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर, गोंदिया, वर्धा, सेवाग्राम आणि अकोला रेल्वेस्थानकावर रिहर्सल (मॉक ड्रील) करून घेण्यात आल्याची माहिती जीआरपीचे अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली आहे.