नागपूर : शहरातील रस्त्यावरील खड्डे, कनक रिसोर्सेसला कंपनीला देण्यात आलेली जादा रक्कम, दहन घाटावरील लाकूड घोटाळा व शहरातील पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे बुधवारी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहे. शहराच्या सर्वच भागातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. खड्ड्यामुळे अपघात वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. मुख्य रस्त्यासोबतच प्रभागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहे. दुरुस्तीची मागणी होत असल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरा जावे लागत आहे. शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस कंपनीला जादा रक्कम देण्यात आली आहे. न्यायालयाने यावर ताशेरे ओढले आहे. ही रक्कम कंपनीकडून वसूल करण्यात यावी, अशी सदस्यांची मागणी आहे. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात याचा समावेश आहे. प्रशासनाने अद्याप या संदर्भात ठोस भूमिका घेतलेली नाही. यातील दोषी अधिकाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी विरोधी सदस्यांची मागणी आहे. दहनघाटावरील लाकूड घोटाळ्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला जाणार आहे. तसेच शहरातील स्टार बसचा प्रश्न मागील काही दिवसापासून चर्चेत आहे. बस आॅपरेटरने शुल्क न भरल्याने परिवहन विभागाने बसेस जप्त केल्या होत्या. यामुळे मनपाच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. नवीन बस आॅपरेटरचा प्रस्ताव आहे. परंतु जुन्या आॅपरेटर सोबत करण्यात आलेला करार रद्द केल्याशिवाय नवीन आॅपरेटसोबत करार करता येणार नसल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. शहरात गेल्या वर्षी शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु त्या तुलनेत झाडे जिवंत नाही. उद्योग विभागाने या संदर्भात काय नियोजन केले, असा प्रश्न किशोर डोरले यांनी उपस्थित केला आहे. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील प्रश्न, ऐवजदार, शहरातील हायमास्ट स्ट्रीट लाईटचे व्यवस्थापन , सफाई कमागारांच्या समस्या आदी विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)नासुप्र विश्वस्तपदी शिंगणे फायनल नागपूर सुधार प्रन्यासवर मनपा सदस्यांतून एक प्रतिनिधी पाठविला जातो. बुधवारी सर्वसाधारण सभेत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. पश्चिम नागपुरातील नगरसेवक भूषण शिंगणे यांची या पदासाठी निवड निश्चित करण्यात आली आहे. शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी मंगळवारी भाजप संसदीय मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून शिंगणे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. बुधवारी सकाळी खोपडे पक्षातर्फे शिंगणे यांचे नाव महापौर प्रवीण दटके यांच्याकडे सोपवतील व महापौर सभागृहात त्यांच्या नावाची घोषणा करतील. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंगणे यांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे.
खड्डे, कचरा व स्टार बसच्या मुद्यावर विरोधक आक्रमक
By admin | Published: September 23, 2015 6:38 AM