नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आणि सिडकोच्या जमीन घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली. या चौकशीस आपण तयार असून, यातील बिल्डर मनिष भतिजा यांचे काँग्रेस सरकारमध्ये ‘चाचा’ कोण होते व त्या काळात याप्रकारे किती भूखंड दिले तेही जाहीर करू, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.आतापर्यंत एकनाथ खडसे, सुभाष देशमुख, सुभाष देसाई, पंकजा मुंडे आदी मंत्र्यांवर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले नव्हते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सिडको जमीन घोटाळ्याबाबत फडणवीस यांच्यावर आरोप केले.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व धनंजय मुंडे यांनीही हीच मागणी केली. मुंबईच्या बिल्डरधार्जिण्या विकास आराखड्याबाबत न्यायालयात दाखल याचिकेच्या धर्तीवर याही प्रकरणात काँग्रेस याचिका दाखल करील, असेही ते म्हणाले. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत या सरकारची भूमिका दुटप्पी असून शिवसेनेच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर चौकशी अधिकारी नियुक्त होतात. मात्र भाजपाच्या मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची लोकायुक्तांकडून चौकशी केली जाते, असे विखे-पाटील म्हणाले. सरकारची एक्स्पायरी डेट ठरली असून ती कदाचित २०१९ पूर्वीच येईल, असे भाकीत त्यांनी केले.दूध धोरण आणणारमागील सरकारने किती बिल्डरांना व कोणाच्या मागणीवरुन लाभ दिला हेही आपण समोर आणू, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या अधिवेशनात शेतक-यांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी ही अपेक्षा असून राज्याचे दूध धोरण जाहीर केले जाणार आहे.खरिपाच्या पेरणीसाठी पीक कर्ज देण्यात झालेली घट, शेतकरी आत्महत्या, सोयाबीन, तूर, कापूस उत्पादन शेतकºयांचे प्रश्न अधिवेशनात मांडू व सरकारला घेरू, असे धनंजय मुंडे म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्यावरील आरोपांची चौकशी करण्याकरिता तयार आहोत. सिडकोच्या भूखंड गैरव्यवहारात बिल्डर भतिजाचे मागील सरकारमधील चाचा कोण होते ते आपण उघड करू.
विरोधक दक्ष, मुख्यमंत्री लक्ष्य! पावसाळी अधिवेशन; भूखंड घोटाळा गाजणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 6:02 AM