कमलेश वानखेडे
नागपूर : भाजप व शिंदे गटाने एकत्र येत मुख्यमंत्रीपदाची सूत्रं एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविली. त्यामुळे आता उपराजधानी असलेल्या नागपूरला किमान तीन मंत्रिपदे मिळतील व विदर्भालाही झुकते माप मिळेल, हे स्पष्ट झाले आहे. सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू, परिणय फुके, संजय कुटे या अनुभवी नेत्यांसह समीर मेघे, आशिष जयस्वाल, रवी राणा यांच्या रुपात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदासह नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे सोपविली जाऊ शकतात. बावनकुळे यांच्या रुपात तेली समाजाला प्रतिनिधित्व मिळाले तर पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा एकदा वंचित राहावे लागेल. हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लावून त्यांच्यावर वर्धा जिल्ह्याची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. मात्र, दक्षिण नागपूरचे आमदार मोहेन मते यांना शहरातून प्रतिनिधित्व देण्याचा विचार झाला तर मेघे यांची अडचण होऊ शकते.
वर्धा जिल्ह्यात ४ पैकी ३ जागा भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र, या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता कमी आहे. अपक्ष गोटातून रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल व भंडाऱ्यातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. यात जुने शिवसैनिक असल्यामुळे जयस्वाल यांचे पारडे जड मानले जात आहे.
भंडारा - गोंदिया जिल्ह्यांत सात मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसची धुरा खांद्यावर घेतलेले प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना त्यांच्या साकोली मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठी गेल्यावेळी पटोले यांना टक्कर देणारे आमदार परिणय फुके यांना पुन्हा एकदा मंत्री बनविण्याची खेळी भाजपकडून खेळली जाऊ शकते. फुके यांचा नागपूर शहर व ग्रामीणमध्ये असलेला संपर्क व टास्क मॅनेजर म्हणून तयार झालेली इमेज याचा फायदा फुके यांना होऊ शकतो. गोंदियातील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना मंत्रिपदाची संधी मिळणे कठीण दिसते. गडचिरोली जिल्ह्याला चंद्रपूरशी जोडले जाईल. सुधीर मुनगंटीवार कॅबिनेट मंत्री होतील व त्यामुळे गडचिरोलीला स्वतंत्र मंत्रिपद मिळणे कठीण आहे.
अमरावतीच्या राणा दाम्पत्याने शिवसेनेविरोधात एकाकी लढा दिला. याचे बक्षीस आमदार रवी राणा यांना मिळेल, असे दिसते. बंडखोर गटाची धुरा सांभाळणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्चित आहे. सूत्रांनुसार अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर किंवा रणजित पाटील यांच्यापैकी एकाला संधी मिळेल.
संजय राठोड यांचे पुनर्वसन
- महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद गमावलेले आमदार संजय राठोड यांना शिंदे गटाकडून मंत्रिपद देऊन पुनर्वसन केले जाऊ शकते. भाजपच्या गोटातून मदन येरावार किंवा उईके यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे माजी मंत्री संजय कुटे यांचे स्थान पक्के आहे. तर बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्याही नावावर राज्यमंत्री पदासाठी मंथन सुरू आहे.