लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचे संक्रमण बघता देशभरात असलेल्या लॉकडाऊनने अनेकांना आपल्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्याची संधी प्रदान केली आहे. शैक्षणिक संस्थांसोबतच ऑफिसही बंद असल्याने अनेकांनी स्वत:ला घरात कोंबून घेतले आहे. कार्यालयीन व्यस्ततेमुळे स्वत:च्या इच्छा पूर्ण करू न शकणारे अधिकारी लॉकडाऊनचा पुरेपुर लाभ घेत आहेत. शिक्षक घरी रिकामे बसण्यापेक्षा रिसर्च पेपर लिहिण्यात व्यस्त आहेत. विद्यार्थ्यांना काही शिक्षक ऑनलाईन लेक्चर व अभ्यासाची सामुग्री पोहोचवून देत आहेत. ‘लोकमत’ने या संदर्भात काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांनी आपला या काळातील अनुभव आमच्या सोबत वाटला.पुस्तकांचे वाचन करून ज्ञानार्जन: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी आपला वेळ घरी बसून पुस्तके वाचण्यामध्ये घालवत असल्याचे सांगितले. लॉकडाऊनमुळे कार्यालयात जाण्याऐवजी फोनवरच अधिकाऱ्यांशी संपर्क होत आहे. पुस्तके वाचताना आपल्या आवडत्या विषयासोबतच अन्य विषयांची पुस्तकेही वाचून काढत असल्याचे त्यांनी सांगितले.बºयाच काळानंतर मिळाली संधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनीही आपले अनुभव व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू असताना प्रशासकीय कामाचा भार मोठा होता. येथेही तसेच काम आहे. लॉकडाऊनमुळे ऑफिस बंद आहे त्यामुळे आपल्या विषयाशी संबंधित पुस्तकांचे वाचन करून वेळ घालवतो आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनाबाबत माहिती गोळा करत असल्याचे त्यांनी सांगितले.होम ड्युटी सुरू!: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे क्षेत्रीय केंद्राचे संचालक डॉ. पी. शिवस्वरूप सध्या घरूनच ऑफिसचे कामकाज पाहात आहेत. यासोबतच घरी असल्यामुळे घरच्या कामातही हातभार देत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या प्रकोपामुळे घरातील कामगारांनी सुटी दिली असल्याने घरचे काम करावे लागते. त्यातून वेळ मिळाल्यावर पुस्तकांचे वाचन करण्यासोबतच कुटूंबीयांसोबत संवाद साधण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.रिसर्च पेपर व अभ्यासक्रमाची समीक्षा: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ह्युनिटीज’ अध्यासनाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शर्मा यांनी लॉकडाऊनचा सदुपयोग रिसर्च पेपर लिहिण्यासाठी होत असल्याचे सांगितले. पुस्तकांचे वाचन करण्यासोबतच अभ्यासक्रमाचे नियोजनही करतो आहे. अभ्यासक्रम उत्तम व्हावा म्हणून हे प्रयत्न असल्याचे शर्मा यांनी सांगितले.मार्च एण्डिंगची कामे: हा काळ मार्च एण्डिंगचा असल्याने, दररोज ऑफिसमध्ये यावे लागत असल्याचे जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी सांगितले. प्रशासकीय कामासोबतच जिल्ह्याच्या सर्व ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर्ससोबत संपर्क साधावा लागत असून, त्यांच्या कामकाजाचा आढावाही घेत असल्याचे त्यांनी सांगितले.