लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी आजवर आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकडे लक्षच दिले नाही. कोरोना संकटात मनपाची रुग्णालये सुसज्ज असणे किती आवश्यक आहे, याची जाणीव झाली. मेयो व मेडिकलच्या जोरावर कोरोनाचा डोलारा सांभाळला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची पाच रुग्णालये अपग्रेड करण्यात आलेली आहेत. परंतु या रुग्णालयांना अजूनही प्रशिक्षित मनुष्यबळासह अत्याधुनिक यंत्रसामुग्री, व्हेंटीलेटर उपलब्ध झाले नाही. परंतु कोरोनाने मनपाला संधी मिळाली आहे. आर्थिक नियाेजन करून आरोग्य सुविधांचे नवे मॉडेल उभारणे शक्य आहे.
३० लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात महापालिका रुग्णालयात जेमतेम १३१ खाटा होत्या. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना काळात महापालिकेची पाच रुग्णालये अपग्रेड केली. खाटांची संख्या ४६० पर्यंत वाढविण्यात आली. यात इंदिरा गांधी रुग्णालय, केटीनगर, आयसोलेशन, पाचपावली व सदर येथील रुग्णालयांचा समावेश आहे.
मनपाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी दरवर्षी तरतूद केली जाते. परंतु ती कमी असूनही खर्च केली जात नाही, असा आजवरचा अनुभव आहे. मुंढे यांनी पाच हॉस्पिटलवर ७.८२ कोटींचा खर्च केला. इमारती दुरुस्त केल्या. काही प्रमाणात यंत्रसामुग्री उपलब्ध केली. परंतु ती पुरेशी नाही. गेल्या वर्षी मनपा अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी ७० कोटींची तरतूद केली होती. परंतु कोरोना संकट असूनही हा निधी खर्चच झाला नाही.
..
अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची गरज
महापालिकेच्या रुग्णालयात सोनोग्राफी, एक्स-रे मशीन नाही. सीटी स्कॅन, एमआरआय, व्हेंटीलेटर अशा स्वरूपाच्या सुविधा नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर या स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करण्याची संधी आहे. याचा शहरातील नागरिकांना लाभ होईल. गोरगरीब रुग्णांना माफक दरात उपचार उपलब्ध होतील. मेयो, मेडिकलवरील रुग्णांचा भार कमी होण्यास मदत होईल.
...
विशेषज्ञांची गरज
मनपा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे. यात मेडिसिन, सर्जरी, बालरोग, विकृतिशास्त्र, बधिरीकरणशास्त्र विशेषज्ञांची नियुक्ती करण्याची गरज आहे. त्याशिवाय मनपा रुग्णालयात उपचार मिळणे शक्य नाही. तसेच परिचारिका, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
...
कोरोना काळात काय अपेक्षित आहे
शहराच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मनपाचे सुसज्ज हॉस्पिटल उभारावे.
प्रत्येक रुग्णालयात कोरोनासह अन्य उपचाराची सुविधा असावी.
मनपा अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करून हा निधी खर्च करावा.
रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपलब्ध करावे.
२४ तास रुग्णालय सुरू राहतील अशी यंत्रणा असावी.
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती.