युवकांना संधी फक्त काँग्रेसमध्येच : सत्यजित तांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 07:55 PM2019-08-24T19:55:07+5:302019-08-24T19:56:00+5:30
युवक काँग्रेसने ६० जागा प्रदेशाकडे मागितल्या आहे. पण निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना नक्कीच संधी मिळणार आहे. इतर राजकीय पक्षाचा विचार केल्यास युवकांना फक्त आता काँग्रेसमध्येच संधी असल्याचे मत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सद्या काँग्रेसचा संक्रमणाचा काळ सुरू आहे. काँग्रेसचे नेते इतर राजकीय पक्षांमध्ये आधार शोधत आहे. काही भिती पोटी तर काही अपेक्षेपोटी जात असल्यामुळे पक्षातील नेते कमी झाले आहे. त्यामुळे आता युवकांना संधी आहे. युवक काँग्रेसने ६० जागा प्रदेशाकडे मागितल्या आहे. पण निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना नक्कीच संधी मिळणार आहे. इतर राजकीय पक्षाचा विचार केल्यास युवकांना फक्त आता काँग्रेसमध्येच संधी असल्याचे मत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.
प्रेसक्लब मध्ये आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष युवकांचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा जागर करण्यात येत आहे. युवक काँग्रेस राज्यभर ‘वेक अप महाराष्ट्र’ हे अभियान राबवित आहे. यात ‘मै भी नायक’ ‘सीएम फॉर ए डे’ या संकल्पनेतून एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १६ ते ३० वयोगटातील तरुणांना मुख्यमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षा किंवा मी मुख्यमंत्री झालो तर काय करणार? हे व्यक्त करण्यासाठी प्लॅटफॉर्म दिला जाणार आहे. यात प्रत्येक जिल्ह्यातून ३ विजयी तरुणांची निवड करून, मुंबईमध्ये या स्पर्धेचा फायनल राऊंड होणार आहे. यातील ५ विजेत्यांना एक दिवसाचे मुख्यमंत्री बनून पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेशातील मुख्यमंत्र्याबरोबर दिवसभर राहून कामकाज पाहण्याची संधी मिळणार आहे. युवकांच्या जाहीरनाम्याचे हे पाच विजेते अॅम्बेसेडर राहणार आहे.
त्याचबरोबर ‘वेक अप महाराष्ट्र’ अंतर्गत ५ कोटी युवकांपर्यंत युवक काँग्रेस पोहचणार आहे. युवकांचे अभिप्राय, त्यांच्या संकल्पना घेऊन युवकांचा स्वतंत्र जाहीरनामा पक्ष काढणार आहे.
आमच्या पक्षात लोकशाहीच्या माध्यमतून घराणेशाही
काँग्रेस पक्षावर नेहमीच घराणेशाहीचा आरोप लावला जात आहे. परंतु आज प्रत्येक पक्षात घराणेशाही आहे. भाजपामध्ये पंकजा मुंडे, पुनम महाजन असे कित्येक नाव आहे. काँग्रेसमध्ये घराणेशाही लोकशाहीच्या माध्यमातून आली आहे. मी स्वत: युवक काँग्रेसचा अध्यक्षपदासाठी दोन वेळा पक्षांतर्गत निवडणुका हरलो आहे. मात्र इतर पक्षात थेट तलवार देऊन, घराण्याचा युवराज घोषित केला जात असल्याचे तांबे यावेळी म्हणाले.