नागपूर : सर्व शाखीय कुणबी कृती समिती व सर्व शाखीय कुणबी संघटने तर्फे मनोज जरांगे यांच्या मागणीला विरोध दर्शविण्यात आला. मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करताना कुणबी जातीचा दाखला मागत आहेत. यावरून दोन समाजात वाद निर्माण करीत आहेत. शासनाने कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
सर्व शाखीय कुणबी संघटनेची सोमवारी धंतोली येथे बैठक झाली. अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम शहाणे पाटील, सुरेश गुडधे पाटील उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र सरसकट देऊ नये. कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करणेच चुकीचे आहे. जरांगे हे अशी मागणी करून दोन समाजात वितुष्ट निर्माण करू पाहत आहे, असे बैठकीत मान्यवरांनी व्यक्त केले.
कुणबी समाजाची भूमिका विषद करणारे विविध मागण्यांचे निवेदन २७ जून रोडी जिल्हाधिकारी यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीत जानराव केदार, राजेश काकडे, पांडुरंग वाकडे, बबन गांजरे, सुरेश वर्षे, प्रल्हाद पडोळे, सुरेश कोंगे, बाळा शिंगणे, रामभाऊ कावडकर, नरेश शेळके, अशोक पांडव, भास्कर पांडे, अरुण वऱ्हाडे, विवेक देशमुख आदी उपस्थित होते.