मंगेश व्यवहारे नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. विरोधी बाकावरील सदस्य अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधात सभागृहात आक्रमक झाले. मात्र सभापतींनी त्यावर बोलू न दिल्याने विरोधी सदस्यांनी सभात्याग करीत सभागृहात बाहेर पडून घोषणाबाजी केली. यावेळी आमदार सतेज पाटील, शशिकांत शिंदे, डॉ. प्रज्ञा सातव, अँड अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले आदी उपस्थित होते.
या संदर्भात बोलताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की बाबासाहेबांच्या अवमान करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात सभागृहात बोलू दिले जात नाही. आम्हाला त्यांच्या वक्तव्याचा निषेध करायचा होता पण सभापतींनी त्याला विरोध केला. त्यामुळे परिषदेच्या कामकाजावर आम्ही बहिष्कार घातला. शशिकांत शिंदे म्हणाले की राज्यात संविधानावरून महाराष्ट्र पेटलाय. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे, अशात शांतता राहावी अशी आमची भूमिका आहे. परंतु केंद्रीय गृहमंत्री मुद्दाम असे वक्तव्य करीत आहे, त्यांचा वक्तव्याचा आम्हाला निषेध करायचा होता, मात्र सभापती यांनी नकार दिल्याने त्यांच्या हुकूमशाहीचा आम्ही निषेध करतो.