लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाल्यानंतर दुसरी सर्वसाधारण सभा २३ ऑक्टोबर रोजी आयोजित केली आहे. ही सभा ऑनलाईन घेण्याचा जि.प. प्रशासनाचा मानस आहे. परंतु ऑनलाईनच्या अडचणी आहेत. आमचे प्रश्न ऑनलाईनद्वारे मांडता येणार नाही, ऑनलाईन सभेतून काहीच साध्य होणार नाही, त्यामुळे सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात घ्यावी, अन्यथा सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेचे वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधक सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत आहेत, तर सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे ही सभा वादळी ठरण्याची शक्यता होती. विरोधकांनी त्यासाठी मोर्चेबांधणीही केली होती. परंतु प्रशासनाने सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. ऑनलाईन सभेतून काहीच साध्य होणार नाही, विरोधकांना प्रश्नच मांडता येणार नाहीत, ऑनलाईन सभेत विरोधकांची सत्ताधारी मुस्कटदाबी करतील, अशी भीती आहे. यासंदर्भात विरोधकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन तक्रारी मांडल्या आहेत तसेच ही सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहातच घ्यावी, अशी मागणी केली आहे.
कोरोनाच्या काळात सभागृहात सभा घेतली. पण ती सभा औपचारिकता म्हणून पार पडली. त्या सभेत विरोधकांना काहीच बोलू दिले नाही. आता ऑनलाईन सभा घेऊन परत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ऑनलाईन सभा झाल्यास आम्ही बहिष्कार टाकणार आहोत.
अनिल निधान, विरोधी पक्षनेते, जि.प.