विरोधकांची आघाडी ही बारुद नसलेला बॉम्ब, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 10:42 AM2023-08-31T10:42:33+5:302023-08-31T10:48:00+5:30
माझ्या लोकसभा प्रवासात लोक मोदी-मोदी असे नारे लावून समर्थन देत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरुद्ध काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांनी उभारलेली ‘इंडिया’ आघाडी म्हणजे ‘बारुद नसलेला बॉम्ब’ असून, त्यांच्याकडून काहीच होणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, इंडिया आघाडीचे घटक पक्ष मुंबई बैठकीसाठी एकत्र आले आहे. ही त्यांची नौटंकी असून, ते मुंबईत येतील, हॉटेलमध्ये राहतील, दोन दिवस फिरतील आणि निघून जातील. त्यांच्या बैठकीत कोणतेही तथ्य नाही. त्यांच्या आघाडीत कुणीही कुणासोबत नाही. आघाडीतील १०-१२ पक्ष असे आहेत की, त्यांचे कुठेही मंत्रीदेखील नाहीत. पंतप्रधान मोदींच्या विरोधात महाराष्ट्रात काही करता येईल का? असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपाच्या ४५हून अधिक लोकसभा जागांवर विजय होईल. माझ्या लोकसभा प्रवासात लोक मोदी-मोदी असे नारे लावून समर्थन देत आहेत.
- काँग्रेसने केला डॉ. बाबासाहेबांचा पराभव
प्रकाश आंबेडकर यांना विरोधकांच्या आघाडीत बोलाविले नसल्याच्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना बोलाविण्याचा निर्णय त्यांचा असला तरीदेखील त्यांची भूमिका कधीही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला पटली नाही. काँग्रेस नेहमीच डॉ. आंबेडकरांविरुद्धच राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव काँग्रेसनेच केला होता, तेव्हाही आणि आजही त्यांची तीच भूमिका कायम आहे.
कर्नाटकच्या जनतेला काँग्रेसने फसविले
- कर्नाटक निवडणुकीत जे आश्वासन काँग्रेसने तेथील जनतेला दिले आहे, ते कधीही पूर्ण करू शकणार नाही. त्यांनी कर्नाटकच्या जनतेला फसविले आहे. १० वर्षांचे बजेट जरी ५ वर्षांत खर्च केले तरीदेखील ती आश्वासने पूर्ण होणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
ट्रिपल इंजिन सरकार आता एकमेकांना धक्के मारत आहे - वडेट्टीवार
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सातत्याने महायुती सरकारवर प्रहार करताना दिसत आहेत. आता त्यांनी ‘ट्रिपल इंजिन सरकारमधील इंजिन एकमेकांना आता धक्के मारत आहेत,’ असे ट्वीट करीत सरकारवर निशाणा साधला आहे.
वडेट्टीवार यांनी व्टीटमध्ये म्हटले आहे की, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांवर बंधने घातली. पण पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी घातलेली बंधने हटवल्याचे वृत्त आले आहे. यातून सरकारची नाचक्की झाली. सरकारमध्ये कोणत्याही विषयावर एक धोरण नाही, फक्त आपापल्या पक्षाच्या नेत्यांसाठी सरकारमधील तिन्ही पक्ष राबत आहेत. सर्वसामान्यांचे सरकार असे काम करते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.