नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याबाबत पुन्हा एकदा म्हटल्यानंतर यात आणखी ठिगणी पडण्याची शक्यता आहे. तर सीमावादाचा मुद्दा उफाळून आलेला असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादावरील ठराव हिवाळी अधिवेशनात आणण्यात यावा, अशी मागणी बुधवारी केली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सातत्याने तिथल्या लोकांना बरं वाटावं म्हणून आक्रमक वक्तव्य करीत आहेत. आपल्यादेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावर आक्रमक भूमिका घेत जशास तसे उत्तर द्यायला हवे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सीमावादावरील ठराव आणण्याबाबत चर्चा झाली होती. तेव्हा सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात हा ठराव कधी मांडणार याबाबत आम्ही सरकारला विचारणा आहे. सीमाभागातील एकेक इंच जागा महाराष्ट्रात आली पाहिजे, हिच आमची भूमिका आहे असे पवार यांनी सांगितलं.
बेळगाव, निपाणी, कारवार, भिलकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. सीमावादावरील ठराव आल्यास त्याला विरोधी पक्षाचे समर्थन राहील, असे अजित पवार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.