नागपूर- राज्यात बुधावारी अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या १२ तासांत काही अधिकाऱ्यांच्या बदलीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. राज्य सरकारच्या या गोंधळावर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.
अधिकाऱ्यांच्या बदलीच्या निर्णयाला स्थगिती देण्यामागचं नेमकं कारण काय, असा सवाल उपस्थित करत याबाबत खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच याआधी देखील दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. संजय राऊत वारंवार नागपूरला आल्यामुळे त्यांना सुबुद्धी येईल, असा टोला फडणवीसांनी राऊतांना लगावला. तसेच नागपुरच्या मातीमध्ये, वातावरणामध्ये एक वेगळेपण असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज नागपूरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पोलखोल आम्ही रोजच करत आहोत. ज्यांची रोज पोलखोल होत आहे, ते अस्वस्थ होऊन आमच्या रथावर हल्ले करत आहेत. कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अमरावतीत इंग्रजांचे राज्य चालायचं तसं पोलिसांचे राज्य चालले आहे. त्या ठिकाणी लांगूलचालन सरकारचे मंत्री करत आहेत. त्यातून परिस्थिती आणखी वाईट होत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.