मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यापेक्षा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विषय सध्या महत्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यामुळे त्यांना सरसकट मदत मिळावी, त्यांना कर्जातून मुक्त करावे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करत आहे. पीक विमा कंपन्यांना वठणीवर आणावे, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर कोणी मंत्री जात नाही. शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. २०२२च्या दुष्काळाचे पैसे दिले नाहीत, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. याआधी विविध माध्यमांनी एक्झिट पोल जाहीर केले. यावर देखील विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणेच होणार...चारही राज्यात काँग्रेस जिंकणार आणि तेलंगणात देखील अतिरिक्त विजय होईल. दिल्लीमध्येसुद्धा पुढच्या काळात बदल झालेला दिसेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.