नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.सुरेश द्वादशीवार यांच्या निवडीला विरोध हे राजकीय षडयंत्र असल्याची टीका विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी एक निवेदन सादर केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, मुळात अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाकरिता राज्य शासनाकडून आर्थिक मदत होत असते, परंतु याचा अर्थ शासनाच्या मर्जीप्रमाणे अशा प्रकारच्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये हस्तक्षेप व्हावा, असा नाही. महाराष्ट्रात बोटावर मोजता याव्या, इतक्या साहित्य क्षेत्रातल्या अनेक विषयांचा गाढा अभ्यास असणाऱ्या अग्रणी साहित्यिकांमध्ये प्रा.द्वादशीवार यांचे नाव आहे, परंतु गांधींच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते असल्यानेच शासनामध्ये असलेल्या नेत्यांनी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये थेट हस्तक्षेप करून त्यांच्या नावाला विराेध केला. याचा निषेधही वंजारी यांनी पत्रकातून व्यक्त केला आहे.
गांधी विचारांचे खंदे पुरस्कर्ते असल्यामुळे विरोध
१२ ऑक्टोबरला नागपुरात ‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य’ या डॉ.मुनघाटे यांनी संपादित केलेल्या पुस्तकावर बोलताना मराठीतील विशिष्ट साहित्यिकांनी आपल्या लोकांकडून महात्मा गांधींवर कसा अन्याय केला, असे मत व्यक्त केले होते, परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य असते. ही बाब लक्षात न घेता, केवळ गांधी विचारांचे खंदे पुरस्कर्ते असल्यामुळे प्रा.सुरेश द्वादशीवारांच्या नावाला विरोध करणे, यावरून विद्यमान सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांची व साहित्यिकांची कोणती मानसिकता लक्षात येते, अशी टीकाही त्यांनी केली.