अध्यक्षांच्या निवडणुकीत गोंधळ : निरीक्षक नावे घेऊन गेले नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षांची निवड करण्यासाठी बुधवारी गणेशपेठेतील पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या विरोधातील गटाने एकच गोंधळ केला. शेवटी निरीक्षकांनी निवडणूक प्रक्रिया न घेता इच्छुकांची नावे मागितली व अध्यक्षांची घोषणा पक्षश्रेष्ठी करतील, असे स्पष्ट केले. मात्र, निरीक्षक गेल्यानंतर बैठकीत समांतर निवडणूक प्रक्रिया घेऊन रमण ठवकर यांची निवड करण्यात आली. आता ही निवड वैध की अवैध असा प्रश्न निर्माण झाला असून राष्ट्रवादीचे मुंबईतील नेते यावर काय निर्णय देतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे वाद रंगला. क्रियाशील सदस्यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला व इतरांना बाहेरच थांबविण्यात आले होते. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विशाल खांडेकर यांनी कार्यकर्त्यांसह बैठकीत जाऊ देण्याची मागणी केली. यावेळी यादीत नावे असलेल्यांनाच प्रवेश मिळेल, अशी भूमिका अजय पाटील यांनी घेतली. यावेळी विशाल खांडेकर व अजय पाटील यांच्यात शाब्दिक खटके उडाले. घोषणाबाजी सुरू झाली. काही वेळातच माजी मंत्री अनिल देशमुख, निवडणूक निरीक्षक. आ. राजेंद्र जैन व आ. प्रकाश गजभिये पोहचले. यावेळी खांडेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आपण क्रियाशील सदस्य असल्याचे सांगत विधानसभानिहाय निवडणुका कधी झाल्या याची माहितीच देण्यात आली नाही, ही प्रक्रियाच अवैध आहे, असा आरोप केला. यावेळी कार्यकर्त्यांनी नारेबाजी सुरू केली. शेवटी आ. जैन यांनी सर्व कार्यकर्त्यांना बैठकीत उपस्थित राहू देण्याची सूचना केली.बैठकीत आ. जैन यांनी समन्वयाची भूमिका घेतली. आपण येथे कुणाचीही अध्यक्ष म्हणून निवड केल्याचे जाहीर करणार नाही, असे स्पष्ट करीत अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांनी नावे देण्याचे आवाहन त्यांनी केले. संबंधित नावे मुंबईला पक्षश्रेष्ठींकडे सोपविली जातील व पक्षश्रेष्ठीच अध्यक्षाच्या निवडीची घोषणा करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पाटील समर्थकांनी निवडणूक घेण्याची मागणी केली.मात्र, आ. जैन यांनी ती मान्य केली नाही. शेवटी रमण ठवकर, अनिल अहीरकर, प्रवीण कुंटे, ईश्वर बाळबुधे, बजरंगसिंग परिहार व महेंद्र भांगे अशा सहा इच्छुकांची नावे निरीक्षकांकडे सोपविण्यात आली. संबंधित नावे घेऊन निरीक्षक निघून गेले. निरीक्षक गेल्यानंतर बैठकीत पाटील समर्थकांनी निवडणूक प्रक्रिया घेण्याचा आग्रह धरला व त्यानुसार निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. रमण ठवकर यांच्या नावावर हात उंचावून त्यांची निवड करण्यात आली. या प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले. यावेळी अजय पाटील हे देखील उपस्थित होते. पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेतून ठवकर यांची निवड झाल्याचे सांगत रीतसर घोषणा मात्र वरिष्ठ नेते करतील, असे सांगितले. तर निरीक्षक आ. जैन यांनी इच्छुकांची नावे घेऊन निवडणूक घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही अवैधरीत्या निवडणूक प्रक्रिया घेण्यात आल्याचा आरोप पाटील यांच्या विरोधकांनी केला आहे. पाटील यांनी पक्षशिस्तीचा भंग केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
शहर राष्ट्रवादीत विरोधकांचा ‘गजर’
By admin | Published: April 16, 2015 2:03 AM