ठळक मुद्देस्वपक्षीयांनाच घरचा दिला अहेर
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी परिचित व गेल्या काही काळापासून मौन धारण केलेले खा. वरुण गांधी यांनी संघभूमीत येऊन स्वपक्षीयांनाच चिमटे काढले आहेत. एक बटन दाबल्याने लोकप्रतिनिधी निवडून येतात. कुठलाही लोकप्रतिनिधी १०० टक्के मते घेऊन निवडून येत नाही. त्यामुळे जिंकल्यावर पाच वर्षांसाठी त्याचे गुलाम म्हणून राहणे ही व्यवस्था देशासाठी योग्य नाही. अनेकदा विरोधी बाकांवर तज्ज्ञ सदस्य असतात. त्यांचा सन्मान व्हायला हवा. या तज्ज्ञांनादेखील मंत्रिपद देता येईल का यावरदेखील विचार व्हायला हवा, असे मत खा. वरुण गांधी यांनी व्यक्त केले. शनिवारी आयोजित युवा सन्मान संवाद युवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला डॉ.आंबेडकरी विचारांचे चिंतक अशोक भारती, राजकुमार तिरपुडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. केशव वाळके प्रामुख्याने उपस्थित होते.संसदेमध्ये २०० हून अधिक खासदारांकडे २० कोटींहून अधिक संपत्ती आहे. अशा खासदारांनी आपले मानधन समाजकार्यासाठी द्यावे, असा प्रस्ताव मी लोकसभा अध्यक्षांना दिला होता. खासदारांना वेतनवाढीची आवश्यकता नाही. परंतु खासदार संसदेत वेतनवाढीसाठी गोंधळ घालतात तो दिवस काळा दिवसच म्हणायला हवा. मी एकट्याने वेतनवाढीचा विरोध केला होता. नऊ वर्षांच्या कार्यकाळात मी एकही रुपयाचे मानधन घेतलेले नाही, असे प्रतिपादन वरुण गांधी यांनी केले. राजकारणाचा वापर जनसेवेसाठीच व्हायला हवा. महिला आरक्षणासंदर्भातदेखील आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. यावेळी वरुण गांधी यांनी राजकारण व तरुणांच्या अपेक्षा यावरदेखील संवाद साधला. यावेळी महेश पवार, मारोती चवरे, संजीवनी ठाकरे पवार, प्रशांत डेकाटे, श्रीकांत भोवते, गौरव टावरी यांचा युवा कृतज्ञता सन्मान देऊन गौरव करण्यात आला. नितीन चौधरी यांनी आभार मानले.बलात्काऱ्यांना त्वरित शिक्षा व्हायला हवीबलात्काराचा गुन्हा हा निंदनीयच असून असे कृत्य करणारी व्यक्ती ही गुन्हेगारच असते. ती कुठल्या वयाची आहे व कुणाशी संबंधित आहे, या बाबींवर चर्चा होणेच अयोग्य आहे. बलात्काऱ्यांना त्वरित शिक्षा व्हायलाच हवी, असे वरुण गांधी म्हणाले.मोदी सरकारच्या कामगिरीवर मौनवरुण गांधींना यावेळी प्रसारमाध्यमांकडून मोदी सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीवर समाधानी आहात का, असे विचारण्यात आले. एकेकाळी प्रसारमाध्यमांशी सहजपणे बोलणाऱ्या गांधी यांनी मौन पाळणेच पसंत केले. मी सध्या बोलणे सोडले आहे, हे त्यांचे वक्तव्य सूचक होते.