जयश्री दुधेनागपूर:यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातोय. शेतीबहुल असणारा जिल्हा असा ओळखला जावा हे निश्चितच भूषणावह नाही. नैसर्गिक आपदा व इतर काही कारणांनी उत्पादनात आलेली तूट शेतकऱ्यांंना निराश करणारी आहे व म्हणूनच येथील शेतकरी वैफल्यग्रस्त झालाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनात आशा निर्माण करणे, त्यांचे मनोरंजन करणे व आपल्या उज्ज्वल भविष्याविषयी शेतकऱ्यांना आश्वस्त करणे गरजेचे आहे. अशा बिकट परिस्थितीत आत्यंतिक गर्तेत गेलेल्या शेतकऱ्यांच्या मनात त्यांची मुलेच हा आशावाद निर्माण करू शकतात. आपली लेकरं गुणवंत आहेत. त्यामुळे त्यांचे व आपलेही भविष्य सुरक्षित असून किमान या मुलांसाठी तरी आपण जगले पाहिजे, असा विचार पालकांच्या मनात निर्माण करणारा उपक्रम शाळेत राबवावयाचे ठरविले.हा, तुमचाही अनुभव असेल की, मुले जेव्हा शाळेत शिकलेली एखादी कविता, गाणे, पाढा असे काही म्हणून दाखवितात त्यावेळी पालक म्हणून तुम्हाला त्या पाल्याचा खूप अभिमान वाटतो. पाहुण्यांसमोर आपण जाणीवपूर्वक मुलांना ते म्हणायला लावतो. खरंतर हा उपक्रम राबविण्याची प्रेरणा मला माझ्या मुलीकडून मिळाली. ती दररोज सायंकाळी मला तिच्या शाळेत काय काय झाले ते सांगायची. तिच्या शाळेत शिकविलेली कविता, गाणे व इतर गोष्टी तिच्या तोंडून ऐकताना मला खूप बरे वाटायचे. दिवसभराचा थकवा पार कुठच्या कुठे पळून जायचा. तिचं सर्व ऐकून मुलीचं व पर्यायाने आपलेही भविष्य सुरक्षित असल्याचे समाधान वाटायचे. हेच समाधान आपण ज्या शाळेत काम करतो तेथील पालकांनाही मिळते किंवा नाही याची पडताळणी मी केली.मुले शाळेत काय शिकली, हे काही सूज्ञ पालक त्यांना घरी विचारत असतात. शहरी पालक आपल्या मुलांशी असा संवाद नियमित साधतात तर ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांशी असा संवाद साधतातच असे नाही हे माझ्या लक्षात आले. मुलांशी जाणीवपूर्वक शैक्षणिक संवाद साधणाऱ्या पालकांची संख्या ग्रामीण भागात फार थोडी असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले. पालकांचा मुलांशी व मुलांचा पालकांशी सहज संवाद होणे अपेक्षित होते. मात्र ते दिसले नाही. म्हणून जे सहज होत नसेल ते जाणीवपूर्वक राबविले पाहिजे, असा संकल्प करुन ‘पालक संवाद’ उपक्रमाला शाळेत सुरवात केली. मुलांशी पालकांचा नियमित संवाद व्हावा हा धागा धरुन उपक्रमाची आखणी केली.मुलांच्या पालकांशी होणाऱ्या संवादाने कुटुंबात होणारा आनंद आपल्या शाळेतील मुलांमुळे त्यांच्या पालकांना मिळावा म्हणूनही ‘पालक संवाद’ हा उपक्रम सुरु केला. यात पालकांऐवजी मुलांनी पालकांशी संवाद सुरु करावा, अशा सूचना दिल्या. मुलांनी शाळेत घडलेल्या चांगल्या बाबी पालकांना सांगाव्यात. गाणी, कविता, प्रार्थना म्हणून दाखवाव्यात. परिपाठ किंवा शाळेत घडलेला एखादा किस्सा, विनोद पालकांशी शेअर करावा. इंग्रजी पाढे, कविता, संभाषण, छोटे इंग्रजी शब्द व वाक्यांचा घरी जाणीवपूर्वक वापर करावा. शाळेत मिळालेली शाबासकी घरच्यांना सांगावी. बक्षीस दाखवावे. शाळेत झालेल्या कार्यक्रमाची घरी चर्चा करावी. आपले शिक्षक, मित्र यांच्या चांगल्या गोष्टी आईबाबांना सांगाव्यात. एखादा विषय, घटना यावर आपली मते मांडावीत. पालकांना या विषयावर बोलते करावे. आपला गृहपाठ, प्रकल्प तयार करताना मुलांनी पालकांची मदत घ्यावी, असे या उपक्रमाचे स्वरुप होते.या उपक्रमाचे खूप असे फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा हा की आमच्या गावात एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. शाळेच्या अनेक चांगल्या बाबी विनासायास पालकांपर्यंत पोहचल्या. या माध्यमातून शाळेचा मॉक प्रचार खूप चांगल्या प्रकारे झाला. त्यामुळे पालक शाळेकडे आकर्षित झाले. दुसरी महत्त्वाची व मोठी बाब शाळेची पटसंख्या वाढविण्यास हा उपक्रम अत्यंत उपयोगी सिद्ध झाला. शाळेचा पट १५४ वरुन २१५ वर पोचला. पालकांना मुलांमध्ये आपले उज्ज्वल भविष्य दिसू लागले. आपली मुले अभ्यासात हुशार असून त्यांच्यासाठी तरी आपण जगले पाहिजे हा भाव अनेक पालकांच्या मनात निर्माण झाला. पालक व मुले यांच्यामध्ये संवाद सुरु झाला. त्यामुळे परस्परांविषयी प्रेम, सहानुभूती निर्माण झाली. शिक्षक, पालक व मुले यांचा आता असा थेट संबंध येऊ लागला. आमच्या निंभा गावात आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. ही जमेची व अभिमानास्पद बाब आहे.
आशावाद; शेतकरी आत्महत्या आणि पाल्यसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 8:00 AM