नागपूर: सेतू केंद्रातून प्रमाणपत्रे मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी शासनाच्याच महा ई सेवा केंद्राचा पर्याय पुढे आला असून या केंद्राची संख्या जिल्ह्यात वाढविण्यात येणार आहे.सध्या जिल्हास्तरावर सेतूच्या माध्यमातून विविध प्रमाणपत्रांचे वाटप केले जाते. मात्र येथून प्रमाणपत्र मिळण्यास कमालीचा विलंब होतो. दलालांचा सक्रिय सहभाग हा या केंद्राची डोकेदुखी आहे. त्यांची साखळी मोडून काढण्यासाठी शासनाने महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून आॅनलाईन प्रमाणपत्र वाटपाची योजना सुरू केली. नागपूर जिल्ह्यासाठी ५२८ केंद्र मंजूर करण्यात आले. त्यापैकी मोजकेच सुरू आहे. लोकसंख्येच्या वाढीनुसार महाईसेवा केंद्राची संख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यानुसार केंद्रांची संख्या ५८१ करण्यात आली आहे. केंद्र वाटपाच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. शहराच्या विविध भागात ही केंद्र सुरू झाल्यावर नागरिकांना सेतू केंद्राला पर्याय उपलब्ध होईल. दलालांकडून होणाऱ्या लुटीपासूनही त्यांची सुटका होईल. जिल्हा सेतू केंद्रातील दलालांवर पायबंद घालण्यासाठी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. शहराच्या विविध ठिकाणी बोगस प्रमाणपत्रेही आढळून आली. त्यावरील शिक्के तंतोतंत जुळणारे होते. एक पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात आल्याचा दाट संशय यातून येतो. मधल्या काळात पोलिसांनी दलालांना पकडले होते त्याच्याकडून प्रमाणपत्रेही जप्त केली होती. पण याच्या मुळाशी कोण आहे याचा शोध लागला नाही. बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्या साखळीचा शोध घेतला त्यात बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. महा ई सेवा केंद्रातील प्रक्रिया आॅनलाईन आहे. मात्र त्याचा प्रचार आणि प्रसार झाला नसल्याने अद्याप या केंद्राकडे जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. (प्रतिनिधी)
‘सेतू’ला पर्याय ‘महा ई-सेवा’केंद्राचा
By admin | Published: October 25, 2014 2:40 AM