कोंढाळी : मी भाजपचा असलो तरी आधी विदर्भाचा पुत्र आहे. त्यामुळे वेळ पडल्यास विदर्भाच्या आंदोलनासाठी राजीनामा देऊ, अशी घोषणा काटोलचे आ. डॉ. आशिष देशमुख यांनी कोंढाळी येथील कार्यक्रमात केली. कोंढाळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पशुसंवर्धन व कृषी विभागाच्यावतीने आयोजित पशुपक्षी व कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे होते. आ. देशमुख म्हणाले, विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यांच्या प्रगतीसाठी आपल्यापरीने जेवढे जमते तेवढे प्रयत्न करणे सुरू आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहे, यासोबतच नवनवीन योजनांचा फायदा शेतकऱ्यांना देण्यासाठी आपला लढा सुरूच राहील. एवढेच नव्हे याच विदर्भातील शेतकऱ्यांसाठी, विदर्भाच्या आंदोलनासाठी श्रीहरी अणेंच्या शब्दावर आपण आमदारकीचा राजीनामाही देऊ, असे देशमुख यांनी जाहीर केले. कार्यक्रमाला पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल ठाकरे, काटोल पंचायत समिती सभापती संदीप सरोदे, कृषी सभापती आशा गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे, अंकुश केदार, शेषराव चाफले, घनश्याम गांधी, डॉ. धारपुरे, योगेश चाफले, डॉ. प्रेरणा बारोकर यांची प्रमुख उपस्थिती होती. (वार्ताहर)विदर्भासाठी राजीनामा दिला - अणेविदर्भ हा आधीपासून समृद्ध प्रदेश होता. इंग्रजांच्या काळात विदर्भातील शेतकरी सधन होते. नव्या कायद्याने मुंबईतील तोट्यात असलेल्या जिनिंग व प्रेसिंग मिल बंद झाल्या. परिणामी विदर्भात फायद्यात असलेल्या मिलही बंद कराव्या लागल्या. तेथूनच विदर्भाला वाईट दिवस सुरू झाले. विदर्भातील हॅन्डलूम नष्ट झाला. मागील ६० वर्षांपासून विदर्भासाठी आर्थिक तरतूद नाही. येथील पैसा पश्चिम महाराष्ट्रात जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचते. विदर्भ राज्य झाल्याशिवाय आता काहीच पर्याय नाही. आपण महाराष्ट्राची राखण करण्यासाठी नव्हे तर स्वतंत्र विदर्भासाठी राजीनामा दिला, असे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी याप्रसंगी सांगितले. आ. देशमुख हे विदर्भाचे सच्चे सैनिक असल्याचे प्रशांसोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
-तर आमदारकीचा राजीनामा देईल!
By admin | Published: March 27, 2016 2:37 AM