- सुमेध वाघमारे
नागपूर, दि.14 - खर्याची व्यसनाधीनता वाढत चालली आहे. लहानपणापासूनच खºर्याचे व्यसन लागल्याने वयाच्या तिशीतच कर्करोगाची लागण झाल्याची शेकडो उदाहरणे समोर येत आहेत. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय २००७ पासून अशा रुग्णांची नोंद ठेवत आहे. गेल्या अडीच वर्षात या रुग्णालयात मुखपूर्व कर्करोगाच्या २४१६ तर मुख कर्करोगाच्या (ओरल कॅन्सर)४७६ रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी धक्कादायक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
राज्यात तंबाकूजन्य पदार्थांवर बंदी आहे. परंतु विदर्भाच्या गावखेड्यांपासून ते शहरातील गल्लीबोळ्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या चौकातील पानठेले आता विशिष्ट तंबाखू, खर्रा, गुटख्यासाठी प्रसिद्ध झाले आहेत. त्याचे ‘परिणाम’ मात्र, आता दिसून येऊ लागले आहेत. मुखपूर्व कर्करोग म्हणजे ज्यांना खर्रा व गुटख्यामुळे पूर्णपणे तोंड उघडता येत नाही (ओरल सबम्युकस फायब्रोसिस) अशा रुग्णांची संख्या वाढल्याचे तर याकडे वेळीच लक्ष न देता उपचार न घेतल्याने मुख कर्करोगाचे (ओरल कॅन्सर) प्रमाण वाढल्याचे वास्तव समोर आले आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने गेल्या अकरा वर्षांतील या दोन्ही रोगाच्या रुग्णांची संख्या उपलब्ध करून दिली आहे. यात आतापर्यंत मुखपूर्व कर्करोगाचे ६३८५ रुग्ण तर मुख कर्करोगाचे १०१३ रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या दोन वर्षात कर्करोगाचे दुप्पट रुग्ण
तंबाकूचे वाढते सेवन ही धोक्याची घंटा ठरत आहे. तंबाकूच्या सेवनाने कर्करोगाचा धोका वाढतो. शिवाय यात कर्करोगाला कारणीभूत ठरणारे अनेक घटक रसायन असतात. कोणत्याही पद्धतीने किंवा कोणत्याही स्तरावर याचे सेवन सुरक्षित नसल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात २०१४ मध्ये तंबाकू, खर्रा, पान व सुपारीमुळे होणा-या ‘ओरल कॅन्सर’चे ९१ रुग्ण, २०१५ मध्ये ११२, २०१६ मध्ये याच्या दुप्पट २६६ तर जुलै २०१७ पर्यंत ९८ रुग्णांची नोंद झाली आहे.
बंदी असतानाही विक्री
गुटखाबंदीनंतर सुगंधित सुपारीवर बंदी आणण्यात आली आहे. असे असतानाही, बाबूल खर्रा, माजा खर्रा, १२० खर्रा, १६० खर्रा, ३२० खर्राा आदींसह विविध प्रकारच्या ख-र्यांची शहरात सर्रास विक्री होते. प्रत्यक्ष अंमलबजावणीपेक्षाही त्या अंमलबजावणीचा गवगवाच फार झाल्याचे चित्र आहे. परिणामी, खर्रा खाणा-यांचे प्रमाण कमी होण्यापेक्षा खºर्याच्या किमतीसोबतच त्याचे सेवन करणा-यांची संख्या वाढतच आहे.
स्वातंत्र्य दिनापासून खर्रा सोडण्याचा करा संकल्प
ख-यामुळे ६० टक्के, गुटख्यामुळे ३० टक्के तर सुपारीमुळे १० टक्के कॅन्सर होण्याची शक्यता असते. दिवसेंदिवस या सर्वच वस्तू जीवघेण्या ठरत आहे. यामुळे याचे सेवन करणाºयांनी हा ७१वा स्वातंत्र्य दिन ख-या अर्थाने साजरा करायचा असेल तर या दिनापासून तंबाखू, खर्रा व सुपारी सोडण्याचा संकल्प करावा.
-डॉ. सिंधू गणवीर
अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय