नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ३७ वा पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ ‘शतस्पंदन’ युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या युवा महोत्सवात महाराष्ट्र गोवा व गुजरात राज्यातील एकूण ३३ विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहे. शतस्पंदनच्या निमित्ताने दाखल झालेल्या बाराशे विद्यार्थ्यांने संत्रा नगरी तरुणाईने फुलून गेली आहे.
विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात मुख्य कार्यक्रम स्थळ, गुरुनानक भवन, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, त्याचप्रमाणे गणित विभागातील श्रीनिवास रामानुजन हॉल येथे विविध स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने विविध विद्यापीठांमधून आलेले विद्यार्थी विद्यापीठाच्या परिसरात स्पर्धेकरिता तयारी करताना दिसून येत आहे. एकमेकांशी आपले अनुभव कथन करीत आहे.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी मुख्य कार्यक्रम स्थळी वन ॲक्ट प्ले, गुरुनानक भवन येथे क्लासिकल व्होकल सोलो लाईट व्होकल सोलो, जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहातील तळमजल्यावरील सभागृहात वादविवाद स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली. तर तिसऱ्या माळ्यावर ऑन स्पॉट पेंटिंग, कोलाज, पोस्टर मेकिंग तर रामानुजन हॉल येथे वेस्टर्न व्होकल व वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल सोलो स्पर्धा पार पडली.