नागपूर : सकाळपासून सुरू झालेला रामभक्तीचा माहाेल रात्रीपर्यंत कायमच होता. जागोजागी प्रभू श्रीरामाचे कटआऊटस् , बॅनर्स, भगव्या स्वागत कमानी, भगवे झेंडे अन् आकर्षक रोषणाईमुळे संत्रानगरी आज भगवी नगरी झाल्यासारखी भासत होती. शहराच्या प्रत्येक प्रभागात आणि प्रत्येक मोहल्ल्यात आज रामभक्तांचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. त्यात उत्तरोत्तर वाढ होत असल्याचे रात्री स्पष्ट झाले. रात्रीच्या वेळी उपराजधानीचे साैंदर्य अधिकच निखरल्यासारखे झाले होते.
खास करून लोकमत चाैक, रहाटे कॉलनी चाैक, नरेंद्रनगर चाैक, रामनगर, लक्ष्मीनगर, गणेशपेठ, खामला, रामदासपेठ, पोद्दारेश्वर राम मंदिर परिसर, सेंट्रल एव्हेन्यू, लकडगंज, गांधीबाग, कॉटन मार्केट, जरीपटका, भगवाघर चाैक, गोळीबार चाैक, महाल, नंदनवन, मानेवाडा, मनीषनगर, सोनेगाव, प्रतापनगरसह शहरातील विविध भागांत आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने त्या भागात दिवाळीची प्रचिती येत होती. आबालवृद्धांची प्रचंड गर्दी रस्त्यारस्त्यांवर बघायला मिळत होती. उपराजधानीत हे वातावरण पहिल्यांदाच बघायला मिळाल्याचे अनेक जण सांगत होते. रात्रीच्या वेळी अनेक भागांत रात्री रॅली निघाल्या. कुठे ढोल-ताशे तर कुठे डीजे दणदणाट आणि 'जय श्रीराम'च्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. अनेक भागातील मंदिरात रात्रीपर्यंत दर्शनार्थींचीही संख्या कमी झालेली नव्हती.
रात्रीपर्यंत सुरू होता महाप्रसादशहरातील अनेक भागांसह खामला परिसरात दुपारी १२ वाजता सुरू झालेला महाप्रसाद रात्रीपर्यंत सुरूच होता. खामल्यातील जय हनुमान शनी मंदिर परिसर तसेच सिंध माता मंदिर परिसर कमिटी आणि तोतवानी मित्र परिवाराने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा कार्यक्रम रात्रीपर्यंत सुरूच होता. विशेष म्हणजे, या मंदिरात अनेक मुस्लिम बांधव पोहोचले आणि त्यांनी दर्शन तसेच महाप्रसादाचाही लाभ घेतला.