मोरेश्वर मानापुरे नागपूर : महाऑरेंजची संत्रा क्लस्टर स्थापनेची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्णत्वास आली आहे. त्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत अॅग्रीकल्चर अॅण्ड प्रोसेस फूड प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (अपेडा) संत्रा क्लस्टर स्थापन करणार असून, त्याअंतर्गत तज्ज्ञांतर्फे संत्र्यांची गुणवत्ता सुधारण्यावर शेतकऱ्यांना तांत्रिक सहकार्य करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात सांगली येथे डाळिंब आणि नाशिकमध्ये द्राक्षे क्लस्टर कार्यरत आहे. संत्र्याचेही क्लस्टर असावे, अशी संकल्पना महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे काही वर्षांपूर्वी मांडली.
यासंदर्भातील पत्र गडकरी यांना दिले. पूर्वीच्या केंद्र शासनामध्ये वाणिज्य मंत्री असलेले सुरेश प्रभू यांनी क्लस्टर मंजूर केले. पण क्लस्टर स्थापनेची सुरुवात बुधवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झाली. अपेडाचे झोनल अधिकारी वाघमारे यांच्याकडे क्लस्टर विकासाची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीधर ठाकरे म्हणाले, बैठकीत कृती आराखडा तयार करण्यात आला. विदर्भातील जास्तीत जास्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्र्याचा दर्जा, गुणवत्ता, पॅकेजिंगसह उत्पादनाची तांत्रिक पद्धतीची माहिती आणि विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.हेक्टरी ७ टन संत्रीविदर्भातील शेतकरी तांत्रिकदृष्ट्या शेती करण्यास मागे असल्यामुळे हेक्टरी केवळ ७ टन संत्र्याचे उत्पादन मिळते. पंजाबमध्ये किन्नो संत्र्याचे उत्पादन हेक्टरी २२ टन तर स्पेन देशात ३० ते १०० टन आहे. उत्पादन वाढविण्यासाठी स्पेनचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.