लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील संत्रा उत्पादकांसाठी मध्य रेल्वेच्या वतीने किसान रेल्वे सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार १७ वॅगन असलेली दुसरी किसान रेल्वे बुधवारी आदर्शनगर दिल्लीला रवाना झाली.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी २१ ऑक्टोबरला मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून किसान रेल्वे चालविण्यात आली. या गाडीला विदर्भातील संत्रा उत्पादकांनी उत्स्फूर्ते प्रतिसाद दिला. विदर्भातील संत्रा उत्पादकांनी १७ वॅगन संत्रा किसान रेल्वेत भरला. यात कळमेश्वर येथून १ वॅगन, काटोलवरून २ वॅगन, वरूडवरून ७ वॅगन, पांढुर्णा येथून ६ वॅगन संत्रा पाठविण्यात आला. किसान रेल्वेसाठी रेल्वे मंत्रालयाने ५० टक्के अनुदान दिल्यामुळे यात थेट शेतकऱ्यांना भाड्यात सवलत मिळत आहे. या सुविधेचे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. किसान रेल्वे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविण्यात आली.