जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक : ११,४७,४६७
प्राधान्य गट - ६,४६,८६५
अंत्योदय - १,२१,७६५
केशरी - ३,७८,८३७
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही आता सवलतीत धान्य मिळणार आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यातील १,११,१४२ केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील ३,९९,९४८ व्यक्तींना याचा लाभ मिळेल. जून महिन्यात याचे वाटप होईल.
राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासंदर्भात २५ मे रोजी शासन निर्णय जारी केला आहे. या अध्यादेशानुसार मागच्या वर्षी मे, जून आणि जुलै २०२० मध्ये शासनातर्फे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीत रेशन वितरित करण्यात आले होते. यात ८ रुपये किलोप्रमाणे गहू व १२ रुपये किलोप्रमाणे तांदूळ प्रति व्यक्ती देण्यात आले होते. त्यावेळी प्रत्येक जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर धान्याचा कोटा उपलब्ध करून देण्यात आला होता. नंतर असे लक्षात आले की, यापैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये धान्य शिल्लक राहिले. त्यामुळे शिल्लक राहिलेले ते धान्य या वर्षी याच योजनेप्रमाणे वितरित करण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बॉक्स
बीपीएलच्या ७,६८,४३० कुटुंबांना लाभ
नागपूर जिल्ह्यात ६,४६,८६५ प्राधान्य गट असलेले शिधापत्रिकाधारक तर १,२१,७६५ अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. यांनाच मोफत धान्य वितरित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात असे एकूण ७ लाख ६८ हजार ४३० कुटुंबांना मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
बॉक्स
केवळ ग्रामीण भाागातील केशरी शिधापत्रिकाधारकांनाच लाभ
नागपूर जिल्ह्यात एकूण ३,७८,८३७ केशरी शिधापत्रिका असलेले कुटुंब आहेत. यापैकी शहरात २,६७,६९५ कुटुंबांकडे केशरी शिधापत्रिका आहे, तर ग्रामीण भागातील १,११,१४२ कुटुंबांकडे केशरी शिधापत्रिका आहे. यापैकी नागपूर शहरातील केशरी शिधापत्रिकाधारकांच्या धान्याचा कोटा मागच्याच वर्षी पूर्ण संपला. त्यामुळे नवीन आदेशानुसार शहरातील केशरी शिधापत्रिकाधारकांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही. ग्रामीण भागातील ११०० मेट्रिक टन धान्याचे वाटप शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामीण भाागातील केशरी कार्डधारकांना याचा लाभ मिळेल.
(बॉक्स)
काय मिळणार?
या योजनेनुसार केशरी शिधापत्रिकेवर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला
१ किलो गहू (८ रुपये किलोप्रमाणे) व १ किलो तांदूळ १२ रुपये किलोप्रमाणे मिळेल. जितके सदस्य असतील तितके धान्य दिले जाईल.
कोट
‘पहिले या, पहिले घ्या’
जिल्ह्यात ११०० मेट्रिक टन धान्याचे वाटप करावयाचे आहे. यापैकी ४२३ टन तांदूळ व ६७७ टन गहू आहे. धान्य संपल्यानंतर वाटप करता येणार नाही. ‘पहिले या, पहिले घ्या’, यानुसार त्याचे वितरण होईल. त्यामुळे केशरी शिधापत्रिकाधारकांनी आवर्जून आपले धान्य घेऊन जावे.
भास्कर तायडे, जिल्हा पुरवठा अधिकारी