लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शब्दांचं प्रेम आणि सुरांची ओढ श्रोत्यांना संगीत मैफिलपर्यंत घेऊन येते. ही मैफिल बहारदार ठरली तर त्यांच्या कानामनातून तृप्ततेचा स्वर ऐकू येतो. अशी तृप्त अनुभूती मंगळवारी श्रोत्यांनी सायंटिफिक सभागृहात सादर शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीत गायन-वादनाच्या सुमधूर कार्यक्रमात घेतली.निमित्त होते स्वरालीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे. स्वराली या वाद्यवृंदात सर्व महिला आहेत. संगीताची निखळ आवड यातून या वाद्यवृंदाची स्थापना झाली. या वाद्यववृंदाने आजवर अनेक ठिकाणी उत्तमोत्तम कार्यक्रम सादर केले आहेत.रौब्य महोत्सवानिमित्त ‘याद पिया की आये’ हा कार्यक्रम सादर झाला. सगळ्या सृष्टीवर सौंदर्य, शितलता व नवसृजनाची शिंपण करणाऱ्या ऋतुराज वसंताच्या स्वागतानिमित्त स्वरालीच्या कलाकारांनी वाद्यवृंदांसह रसिल्या अनुभूतीच्या दादरा, ठुमरी, कजरी, टप्पा अशा उपशास्त्रीय संगीताचा आनंददायी स्वरोत्सव साजरा केला. निर्मिती संकल्पना नंदिनी सहस्रबुद्धे यांची होती. लोकधूनवर आधारीत व मिश्र खमाज, झिंझोटी, पहाडी, सरस्वती अशा रागांवर आधारीत ठुमरी, दादरा व नाट्य संगीताच्या रचनांना स्वरांकित करीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘कौन गली गयो श्याम..., आज श्याम मोह लियो बासुरी बजाईके..., जय गंगे भागीरथी...’ अशा मधुर बंदिशी सादर करण्यात आल्या. नंदिनी यांच्यासह दीपाली खिरवडकर, हेमा पंडित, स्वाती गोखले, सुनिता राजनेकर, भावना तीर्थगिरीकर, अंजली सुभेदार, श्रुती वैद्य, वीणा मोहोड, हर्षदा हेडाउ, मृदुला सुदामे (सतार), डॉ. नीलिमा कुमारन, डॉ. लता मोडक, ओजस्विनी डिखोळकर (व्हायोलिन), रेखा साने (हार्मोनियम), धनश्री देशपांडे, पद््मजा खानझोडे (तबला), स्मिता देशपांडे (मायनर), विद्या बोरकर (गायन) आदी सहभागी कलावंत होते. यानंतर सुरमणी गायिका डॉ. चित्रा मोडक यांनी आपल्या खास अंदाजात ‘सैंया बिन घर सुना...’ ही विरही प्रेमभावाची ठुमारी अप्रतिमपणे सादर केली. विशाखा मंगदे, डॉ. सानिका रुईकर, सरोज देवधर, दीपा धर्माधिकारी, नीरजा वाघ, श्यामला रेखडे, अनुराधा पाध्ये, मेहरा रामडोहकर, जयजयवंती आचार्य या गायिकांनी नजाकतीने उपशास्त्रीय गायन केले. ‘नई झुलकीनी छैया बलम..., केसरीया बालम पधारो मारो देस जी..., याद पिया की आये...’ असे अर्थभावपूर्ण सादरीकरण केले. निवेदन नीता परांजपे यांनी तर सहसंगत विवेक संगीत, शिरीष भालेराव व सुमेधा वझलवार यांची होती.सुरुवातीला संगीत क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या गायिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. चित्रा मोडक, डॉ. अपर्णा अग्निहोत्री, डॉ. साधना शिलेदार, प्रा. दीपश्री पाटील यांचा दमक्षेसां केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, अनुराधा मुंडले, नंदिनी व विद्याधर सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत सत्कार झाला.
नागपुरातील महिलांचा वाद्यवृंद, स्वरालीचा रौप्य महोत्सव; श्रोत्यांनी घेतला आस्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:05 AM
शब्दांचं प्रेम आणि सुरांची ओढ श्रोत्यांना संगीत मैफिलपर्यंत घेऊन येते. अशी तृप्त अनुभूती मंगळवारी श्रोत्यांनी सायंटिफिक सभागृहात सादर शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीत गायन-वादनाच्या सुमधूर कार्यक्रमात घेतली.
ठळक मुद्देरसिल्या उपशास्त्रीय संगीत गायन-वादनाची मैफिल