नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. यामुळे ‘सीसीसी’ व ‘डीसीएचसी’मध्ये ५० टक्के क्षमतेपेक्षा कमी रुग्ण असल्यास हे रुग्ण इतर सेंटरमध्ये हलविण्याची व रुग्ण नसेल तर ते सेंटर बंद करून कंत्राटी मनुष्यबळ कमी करावे, असे निर्देश आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईने दिले आहेत. यामुळे नागपूर जिल्ह्यातील २ ‘डीसीएचसी’ व ११ ‘सीसीसी’ बंद केले जाणार आहेत. नागपुरात केवळ आमदार निवासातील ‘सीसीसी’ सुरू राहणार आहे. सध्या येथे १२ रुग्ण आहेत.
कोरोनाचा पहिल्या लाटेत क्वारंटाईन सेंटर म्हणून आमदार निवास, व्हीएनआयटी, रविभवन, वनामती, पाचपावली व सिम्बॉयसिस सुरू करण्यात आले होते. नंतर बाधितांची संख्या वाढल्याने व रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आमदार निवासाला कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) रुपांतरीत करण्यात आले. त्यानंतर काहीच दिवसात पाचपावली, वनामती व व्हीएनआयटीतही हे सेंटर सुरू झाले. परंतु नोव्हेंबर २०२० मध्ये रुग्णसंख्या कमी होताच आमदार निवास व वनामती सेंटर बंद करण्यात आले. फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागताच २३ मार्च रोजी आमदार निवास सुरू करण्यात आले. आता नव्या आदेशानुसार शहरातील आमदार निवास सुरू ठेवून व्हीएनआयटी व पाचपावली सेंटर बंद करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत. या शिवाय, ग्रामीणमधील ९ ‘सीसीसी’ व २ ‘डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर’ (डीसीएचसी)बंद होणार आहेत. यातील हिंगणा येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटलमधील सेंटरचा समावेश आहे.
-शेकडो कर्मचाऱ्यांवर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड
गरज संपताच काढून टाकण्याच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा ‘सीसीसी’ व ‘डीसीएचसी’मधील कंत्राटी मनुष्यबळावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जवळपास २०० कर्मचाऱ्यांना काढले जाण्याची माहिती आहे. तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात असताना या कर्मचाऱ्यांना काढून टाकणे योग्य नसल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.