जिल्हाधिकारी : घरमालकाला दुकान हस्तांतरण करा नागपूर : प्रत्यक्षात सोमलवाडा, मनीषनगर येथील प्लॉट नं. १२ करिता गुमास्ता परवाना दिला असताना, दुकानदाराने प्लॉट नं. १२० वर बीअर शॉपी सुरू करून शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सुनावणीदरम्यान दुकान खाली करून घरमालकाला हस्तांतरण करण्याचे आदेश शॉपीच्या संचालकांना दिले आहेत. काजल बीअर शॉपी असे दुकानाचे नाव असून, प्रभाकर जगन्नाथ हटवार असे घरमालकाचे नाव आहे. ३१ मार्चला झालेल्या सुनावणीवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक (नागपूर जिल्हा) स्वाती काकडे, उपअधीक्षक मिलिंद पटवर्धन, बीअर शॉपीच्या संचालिका सविता जयस्वाल आणि त्यांचे पती सुनील जयस्वाल उपस्थित होते. काजल बीअर शॉपीच्या परवान्याचे नूतनीकरण करू नका, असे मौखिक आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाती काकडे यांना दिले. शॉपीवर वर्षात चारदा कारवाई काजल बीअर शॉपी भरवस्तीत असून दारूड्या लोकांचा त्रास होतो. यासंदर्भात लोकांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शॉपी रात्री १२ पर्यंत सुरू असते, शिवाय शॉपीमध्ये ग्राहक पिताना आढळल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शॉपीवर वर्षात चारदा दंडात्मक कारवाई केली आहे. नियमाची पायमल्ली करून शॉपीसमोरील २०० चौरस फूट खुल्या जागेवर लोक बीअर पितात, अशा लोकांच्या तक्रारी आहेत. तसेच परवान्याचे नूतनीकरण करताना उत्पादन शुल्क विभागाने घरमालकाचे नाहरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. याउलट अधिकारी त्यांना सन १९४९ च्या नियमाचा दाखला देऊन परवान्याचे नूतनीकरण करीत आहेत. चुकीच्या जागेवरील दुकानाला गुमास्ता दिल्याची फाईल अपर आयुक्त (कामगार) कार्यालयातून गहाळ झाल्याचा आरोप घरमालकांनी केला आहे. शॉपी परवान्याविना सुरू ३१ मार्चला सुनावणीवेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी एक महिन्यात दुकानाचे हस्तांतरण घरमालकाला करण्याचे आदेश सविता जयस्वाल यांना तर शॉपीच्या परवान्याचे नूतनीकरण न करण्याचे निर्देश स्वाती काकडे यांना दिले होते. शॉपीचे नूतनीकरण झालेले नाही, पण शॉपी परवान्याविनाच सुरू आहे, याकडे राज्य उत्पादन विभागाचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे कानाडोळा करून शॉपी सुरू ठेवण्यासाठी मदत करीत आहेत. घरावरील व्हिडिओ कॅमेरा काढण्याचे सोनेगांव पोलिसांचे आदेश चोरीला आळा घालण्यासाठी घरमालक प्रभाकर हटवार यांनी घरावर व्हिडिओ कॅमेरे लावले आहेत. बीअर शॉपीमध्ये ग्राहक बीअर पित असल्याची नोंद कॅमेऱ्यामध्ये होते. यासंदर्भात शॉपीच्या संचालकांनी घरमालकाविरुद्ध सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. घरमालक प्रभाकर यांना ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक आणि एएसआय संदीप येरे यांना कॅमेरे काढण्याची तंबी दिली. एकीकडे पोलीस आयुक्त कॅमेरे लावण्याचे आदेश देतात, तर दुसरीकडे पोलीस कॅमेरा काढण्यास सांगतात हा विरोधाभास आहे. आर्थिक व्यवहारामुळे पोलीस शॉपी मालकाला अप्रत्यक्षरीत्या मदत करीत असल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी) नकली नोटरी करून दुकान ताब्यात शॉपीचा परवाना २७ एप्रिल २०११ रोजी नीरज जयस्वाल आणि सविता जयस्वाल यांना दिला होता. नीरज जयस्वाल यांनी शॉपी सुरू केली होती. पण काही वर्षांनंतर सविता यांचे पती सुनील जयस्वाल यांनी नकली नोटरी करून नीरज जयस्वाल यांचे नाव परवान्यावरून कमी केले आणि शॉपी सविता जयस्वाल यांच्या नावावर केली. या जागेसाठी सुनील जयस्वाल यांनी अॅडव्हान्स दिलेला नाही आणि भाडेही देत नसल्याचा आरोप घरमालकांनी केला आहे.
काजल बीअर शॉपी बंद करण्याचे आदेश
By admin | Published: May 03, 2017 2:29 AM