लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिल लाईन्स येथील ग्रेड-१ हेरिटेज झिरो माईलचा ताबा स्वत:कडे घेतला आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाला या हेरिटेजची देखभाल करण्याचे निर्देश जारी केले आहेत. देखभालीचे काम येत्या एक-दोन दिवसात सुरू केले जाणार आहे.
राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. रवी देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या तारखेला न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना झिरो माईलचा ताबा घेण्यास व त्याची देखभाल करण्यास सांगितले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता २५ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.