लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये याकरिता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पाच कोटी ६७ लाख २७ हजार ८०० रुपयात १००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदी करण्याचा आदेश जारी केला आहे. यासंदर्भात मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.
प्रतिज्ञापत्रातील अन्य माहितीनुसार, दोन कोटी ८७ लाख ८७ हजार ८८० रुपयात १३० अॅडल्ट व्हेंटिलेटर्स खरेदीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा खणीकर्म निधीच्या रकमेतून जिल्ह्यातील १६ सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारले जाणार आहेत. शालिनीताई मेघे रुग्णालय, वानाडोंगरी, लता मंगेशकर रुग्णालय, डिगडोह, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, जामठा व म्यूर मेमोरियर रुग्णालय, सीताबर्डी येथेही ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची गरज असून, त्यासाठी लागणारे सात कोटी २५ लाख रुपये मॉइलच्या सीएसआर निधीमधून खर्च केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणावर न्यायालयात बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे.