नागपूर : रिलायन्स कंपनीकडून शहरात ‘४ जी’ ची लाईन टाकण्यासाठी करण्यात येत असलेल्या खोदकामाचा मुद्दा गुरुवारी महापालिकेच्या सभेत गाजला. नगरसेविका आभा पांडे यांनी रियालन्सच्या कारभाराकडे प्रशासनाने हेतूपूरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. शेवटी पांडे यांच्या सर्व मुद्यांची दखल घेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रिलायन्सला खोदकाम थांबविण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले. सोबतच खोदलेले खड्डे बुजविले आहेत की नाही याबाबत झोनचे सहायक आयुक्त व अभियंत्याकडून अहवाल मागविण्यात आल्याचे स्पष्ट केले. प्रश्नोत्तराच्या तासात आभा पांडे यांनी या विषयाला वाचा फोडली. त्या म्हणाल्या, मोठ्या प्रमाणात नियमबाह्य खोदकाम करण्यात येत आहे. दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त खोदकाम केले जात आहे. खोदलेले खड्डे बुजविण्यात न आल्याने अपघात होत आहेत. टॉवर उभारण्यासाठी रिलायन्सने विमानतळ प्राधिकरण, वाहतूक पोलिसांची परवानगी घेतलेली नाही. निविदेत टॉवर लावण्याच्या जागांचा उल्लेख नाही. पथदिव्यांच्या खांबावरून केबल टाकण्यात आल्याचे शहराचे सौंदर्य खराब झाले असून भविष्यात हे खांब कोसळण्याचा धोका आहे. रिलायन्सने खासगी घरांवर लावलेल्या टॉवरचे शुल्क अद्याप महापालिकेकडे जमा केलेले नाही. असे असतानाही त्यांना रस्त्यावर टॉवर उभारण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करीत महापालिका अधिकाऱ्यांच्या संरक्षणामुळे रिलायन्सचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. चौकांमध्ये रिलायन्सचे जाहिरात फलक लावल्याने वाहनचालकांना बाजूने येणारी वाहने दिसण्यात अडचणी येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या मुद्यांची दखल घेत योग्य ती पावले उचलण्याची हमी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. २ मार्च रोजी रिलायन्सला बँक गॅरंटीची रक्कम जप्त करण्याबाबत नोटीस देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रिलायन्सचे खोदकाम थांबविण्याचे आदेश
By admin | Published: March 20, 2015 2:24 AM