खामगाव पोलिसांविरुद्ध  कारवाई करण्याचे  आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 08:21 PM2018-03-09T20:21:19+5:302018-03-09T20:21:29+5:30

Order to take action against Khamgaon police | खामगाव पोलिसांविरुद्ध  कारवाई करण्याचे  आदेश 

खामगाव पोलिसांविरुद्ध  कारवाई करण्याचे  आदेश 

Next
ठळक मुद्देहायकोर्ट : तिघांविरुद्ध अनधिकृतपणे नोंदवले गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिसांनी सार्वजनिक धान्याच्या अफरातफर प्रकरणात तिघांविरुद्ध अनधिकृतपणे गुन्हे नोंदविले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांवर ताशेरे ओढले. तसेच, याची गंभीर दखल घेऊन जबाबदार पोलिसांवर कारवाई करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांना दिला.
जयकुमार चांडक यांचे खामगाव येथे स्वस्त धान्याचे दुकान आहे. दुकानाचा परवाना त्यांच्या नावावर आहे. दुकानाच्या जागेत त्यांची मुले व सुनांचा वाटा आहे. अफरातफरीची गुप्त माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी १ सप्टेंबर २०१७ रोजी स्वस्त धान्य दुकानात धाड टाकून एकूण ३२ लाख ४० हजार ३९५ रुपयांचा माल जप्त केला होता. त्यानंतर जयकुमार यांच्यासह त्यांचा मुलगा विशाल आणि सुना चंचल व उमा यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमच्या कलम ३ व ४ आणि भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४०७ व १२०-ब अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. विशाल, चंचल व उमा यांना ते केवळ जमिनीचे सहमालक असल्यामुळे प्रकरणात गोवण्यात आले. या तिघांनी त्यांच्याविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता हा आदेश दिला. तसेच, अर्जदारांचा स्वस्त धान्य दुकानातील व्यवहाराशी काहीच संबंध नसल्याचे व केवळ जमिनीचे सहमालक असल्यामुळे त्यांना प्रकरणात आरोपी करता येणार नाही असे स्पष्ट करून अर्जदारांविरुद्धचा एफआयआर रद्द केला. अशा प्रकारे गुन्हे नोंदविणे म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग करणे होय असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. अर्जदारांतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.

Web Title: Order to take action against Khamgaon police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.