याकूब मेमनची फाशी : वरिष्ठांना गोपनीय पत्र नागपूर : १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याच्या फाशीच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी कारागृह आणि पोलिसांसह २२ विभागांना गोपनीय पत्र पाठविले आहे. या विभागाच्या वरिष्ठांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, त्यांना या पत्रातून त्यांची भूमिकाही समजावून सांगण्यात आली आहे. दुसरीकडे पुढच्या काही तासात याकूबला भेटण्यासाठी त्याचे नातेवाईक आणि वकील येणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे. याकूबला ३० जुलैला फासावर लटकवले जाण्याचे जवळपास पक्के झाले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाची धावपळ वाढली आहे. दुसरीकडे सुरक्षा यंत्रणाही अलर्ट झाल्या आहेत. त्यांनी कारागृह प्रशासन आणि पोलिसांना काय काळजी घ्यायची, त्यानुषंगाने विस्तृत नियमावलीच पाठवल्याची माहिती आहे. फाशी देण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र, हे केवळ दोनच प्रशासन फाशीच्या अंमलबजावणीसाठी संबंधित नाही तर, आरोग्य विभाग, महसूल विभाग, वाहतूक विभाग आणि अन्य विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर, या सर्व विभागांच्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्यात आल्याची माहिती आहे. कुणाला काय भूमिका वठवावी लागेल, ते स्पष्ट करण्यासोबतच उच्चस्तरावर गोपनीयता बाळगण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वच संबंधित विभाग प्रमुख कामाला लागले आहे. (प्रतिनिधी)विशेष खबरदारीच्या सूचना दरम्यान, याकूबचे काउंटडाऊन सुरू झाल्यामुळे त्याचे नातेवाईक, मित्र आणि वकील येत्या काही तासात नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात भेटीला येणार आहेत. भेटीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणांनी कारागृह प्रशासन आणि पोलिसांना विशेष खबरदारीच्या सूचना केल्या आहेत.
सुरक्षा यंत्रणांचे विविध विभागांना आदेश
By admin | Published: July 18, 2015 3:02 AM