सुदाम राखडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : राज्य शासनाने २५ टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले असताना, कामठी तालुक्यात मात्र ५० टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या प्रक्रियेत शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आल्याचा आराेपही काही तलाठ्यांनी केला आहे. माेठ्या गावांमधील तलाठ्यांची पदे रिक्त असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.
कामठी तालुक्यातील एकूण ७८ गावे २४ पटवारी हलक्यात विभागण्यात आली आहेत. तालुक्याला एकूण २४ तलाठ्यांची आवश्यकता असताना २२ तलाठी कार्यरत असून, दाेन पदे काही वर्षांपासून रिक्त आहेत. राज्य शासनाने महसूल विभागातील २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले हाेते. त्याअनुषंगाने कामठी तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात तालुक्यातील २५ तलाठ्यांच्या बदल्या हाेणे अपेक्षित असताना त्या ५० टक्के करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
बदली करण्यात आलेल्या तलाठ्यांना १ ऑगस्टपासून कार्यमुक्त करण्यात आले आहे. या बदली प्रक्रियेत शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचा आराेप जाणकार व्यक्तींसह काही तलाठ्यांनी खासगीत केला असून, तलाठ्यांअभावी कामे खाेळंबली असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्यातील तीन गावांमधील तलाठी कार्यालयात तलाठ्यांची नियुक्ती करण्यात न असल्याने १५ दिवसांपासून कामे खाेळंबली आहेत, अशी माहिती या गावांमधील शेतकऱ्यांनी दिली. तलाठ्यांनी वेळीच नियुक्त न केल्यास आंदाेलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
...
१२ गावात नियुक्ती, तीन गावांचे काय?
बदली प्रक्रियेतील घाेळ चव्हाट्यावर येताच, जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देण्यात आला. त्यांच्या आदेशान्वये कामठी तालुक्यातील १२ तलाठी कार्यालयात तलाठ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येरखेडा, आजनी व साेनेगाव (राजा) ही तालुक्यातील माेठी गावे आहेत. या गावांमध्ये अद्यापही तलाठ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. ती कधी केली जाणार, असा प्रश्नही या गावांमधील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.