देशकर कुटुंबीयांनी ठेवला आदर्श : तिघांना जीवनदान तर दोघांना मिळाली दृष्टी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘ब्रेन डेड’ असल्याचे माहीत होताच आपला माणूस गमावल्याचे त्यांना असह्य दु:ख होते. मात्र स्वत:ला सावरत एक निर्णय घेतला, आपल्या माणसाचे अस्तित्त्व कायम ठेवण्याचा तो निर्णय होता. जेव्हा डॉक्टरांना सांगितले तेव्हा त्यांनाही याचे आश्चर्य वाटले. परंतु त्यांनी वेळ न दवडता पुढील घडमोडीला वेग दिला. देशकर कुटुंबीयांचा संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे तिघांना जीवनदान मिळाले तर दोन अंध व्यक्तीच्या जीवनातील अंधार दूर झाला. विनायक रामराव देशकर (६७) रा. मधुबन ले-आऊट नरेंद्रनगर असे त्या ब्रेन डेड (मेंदू मृत) व्यक्तीचे नाव तर दु:ख बाजूला सारत दुसऱ्यांचा जीव वाचविण्याचा तो धाडसी निर्णय घेणाऱ्या त्यांच्या पत्नी गायत्री देशकर होत्या. या निर्णयला त्यांची मुले अनुराग व अभिषेक यांनी पाठिंबा दिला. १६ जूनच्या रात्री विनायक देशकर यांना एका खासगी इस्पितळात भरती केले तेव्हा ते कोमात गेल्यासारखेच होते. विविध तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी मेंदू मृत झाल्याची कल्पना देशकर कुटुंबीयांना दिली. त्यावेळी पत्नी गायत्रीसह, मुले व इतर नातेवाईकांचा दु:खाचा बांध फुटला. सर्वच दु:खात असताना आपले पती आपल्याला कधी दिसणार नाही हे दु:ख गायत्री यांना सलत होते. ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, त्या स्थितीतही त्यांचे अस्तित्व कायम रहावे, यासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटत होते. आणि अचानक काही दिवसांपूर्वी वाचलेल्या एका वृत्तपत्रामधील बातमीच डोळ्यासमोर आली. ती बातमी होती, चेन्नईमध्ये एका ‘ब्रेन डेड’दात्याकडून युवकाला देण्यात आलेल्या हृदयाची. तत्काळ निर्णय घेण्याची इच्छा होती पण धाडस होत नव्हते. ते बरे होतील ही भाबडी आशा होती. वेळ जात होता. निर्णयाला घेऊन मनाची घालमेल सुरू होती. ते बरे होऊ शकतील का, म्हणून मुंबईतील ओळखीचे न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर देवपुजारी यांच्याशी चर्चा केली, परंतु त्यांनीही शक्यता नाकारली. मंगळवारी मन खंबीर केले. हा निर्णय दोन्ही मुलांना सांगितला. सुरुवातीला त्यांनाही अवघड गेले. परंतु आई म्हणत आहे, बाबांचे अस्तित्व कायम राहील व काहींना आपण जीवनदान देऊ शकू या जाणिवेने त्यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. डॉक्टरांना जेव्हा यांच्या अवयव दानाचा निर्णय सांगितला तर त्यांनी योग्य निर्णय घेतल्याचे सांगत स्वत:हून पुढाकार घेतला. पुढील गोष्टी घडवून आणल्या. जावई वीरेंद्र पात्रीकर, डॉ. शैलेश पितळे, विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राचे सचिव डॉ. रवी वानखेडे यांनी या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली, मदत केली. परंतु अवयव दानाचा निर्णय घेतल्याच्या दिवसांपासून ते प्रत्यक्ष अवयव दानाच्या दिनापर्यंत जीवाची घालमेल सुरूच होती. ते सोबत नसले तरी त्यांचे अस्तित्व कायम राहणार आहे, हे मनाला समजावत होते.
पत्नीच्या पुढाकारामुळेच घडले अवयव दान
By admin | Published: June 26, 2017 2:10 AM