नागपूर : विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र (झेडटीसीसी) स्थापन होऊन ८ वर्षे झाले असताना पहिल्यांदाच ‘सीआरपीएफ’ जवानांकडून गुरुवारी अवयवदान झाले. नागपूर परिमंडळात हे ७१वे ‘मेंदू मृत’ व्यक्तीकडून अवयवदान होते. आतापर्यंत १२२ व १२३ वे मूत्रपिंड तर ४२ वे यकृत प्रत्याराेपण झाले. विभागात सर्वाधिक यकृत प्रत्यारोपण न्यू इरा हॉस्पिटलमध्ये झाले. कोरोनाच्या काळात पाचवे अवयव प्रत्यारोपण ठरले.
निपाणी ता. येरनडोल जिल्हा जळगाव येथील संदीप रामदास महाजन (३९) त्या अवयवदात्याचे नाव. ‘झेडटीसीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, संदीप यांना मेंदूचा दुर्मीळ आजार होता. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना प्रकृती ढासळली. २४ फेब्रुवारी रोजी ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदु मृत झाल्याची घोषणा डॉक्टरांच्या पथकामधील मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. पराग मून, डॉ. अमोल कोकस व डॉ. साहिल बंसल यांनी केली. याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. सोबतच अवयवदानासाठी समुपदेशन केले. त्या दु:खातही आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. यासाठी त्यांच्या पत्नी मोनाली व मुलांनी पुढाकार घेतला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. संजय कोलते यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन कॉर्डिनेटर वीना वाठोडे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. महाजन यांचे दोन्ही मूत्रपिंड, यकृत व दोन्ही नेत्र दान करण्यात आले.
-अवयवदानाने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी
महाजन यांच्या अवयवदानाने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. एक मूत्रपिंड न्यू इरा हॉस्पिटलमधील ५२ वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आले. प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया डॉ. रवी देशमुख व डॉ. शब्बीर राजा यांच्या मार्गदर्शनात झाली. दुसरे मूत्रपिंड आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी वर्धा येथील ३५ वर्षीय रुग्णाला देण्यात आले. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. संजय कोलते, डॉ. जय धर्माशी व डॉ. नीलेश गुरु यांनी केली.
-न्यू इरा हॉस्पिटलमध्ये ३६वे यकृत प्रत्यारोपण
नागपूर विभागात पहिले यकृत प्रत्यारोपण न्यू इरा हॉस्पिटलमध्ये झाले. याच हॉस्पिटलमधील ६० वर्षीय पुरुष रुग्णाला महाजन यांचे यकृत देण्यात आले. या हॉस्पिटलचे हे ३६ वे यकृत प्रत्यारोपण होते. ही शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, डॉ. निधीश मिश्रा यांच्या मार्गदर्शनात यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. स्नेहा खाडे यांनी केली.
-प्रत्यारोपणापासून फुफ्फुस वंचित
महाजन यांच्या कुटुंबीयांनी फुफ्फुसाचेही दान करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी मुंबई येथील कोकीळाबेन हॉस्पिटलची चमू सकाळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचली; परंतु वैद्यकीयदृष्ट्या फुफ्फुस योग्य नसल्याने प्रत्यारोपण होऊ शकले नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-८८ किलोमीटरचे ग्रीन कॉरिडॉर
दुसरे मूत्रपिंड नागपूर येथून आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी वर्धा येथे पाठविण्यात आले. यासाठी वाहतूक पोलिसांनी ८८ किलोमीटरचे ग्रीन कॉरिडॉर तयार केले होते. नागपूरचे पोलीस उपआयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनात १७ मिनीटात रुग्णवाहिकेने नागपूर हद्द ओलांडली.