नागपूर : अचानक प्रकृती खालवून ब्रेन डेड झालेल्या एका अभियांत्रिकी व्यक्तीचा अवयवदानासाठी पत्नीसह भावाने पुढाकार घेतला. त्यांच्या या मानवतावादी निर्णयाने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. या वर्षातील हे २५वे अवयवदान ठरले.
वैभव कार्लेकर (४७) रा. कामठी त्या अवयवदात्याचे नाव. विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र (झेडटीसीस) यांनी उपलब्ध करुन दिलेल्या माहितीनुसार, वैभव हे व्यवसायाने सिव्हील इंजिनीअर होते. काही दिवसांपूर्वी त्यांची अचानक प्रकृती खालवली. त्यांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) वर्धा येथे दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे उपचार केले. परंतु न्यूरोलॉजिकलदृष्ट्या प्रकृती खालावली आणि डॉक्टरांच्या टीमने त्यांना मेंदू मृत घोषित केले. रुग्णालयाचे डॉ.विठ्ठल शिंदे यांनी अवयवदानासाठी कुटुंबाचे समुपदेशन केले. त्यांच्या पत्नी कीर्ती कार्लेकर व भाऊ विलास कार्लेकर यांनी त्या दु:खातही अवयवदानाला संमती दिली. याची माहिती डॉक्टरांनी ‘झेडटीसीसी’ला दिली. समन्वयक दिनेश मंडपे यांनी प्रतीक्षा यादी तपासून गरजू रुग्णांना अवयवदान केले.
यकृत, मूत्रपिंडसाठी ग्रीन कॉरिडॉर
वैभव कार्लेकर यांचे दोन्ही मूत्रपिंड, यकृत व बुबूळ दान करण्यात आले. एक मूत्रपिंड आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) वर्धा येथील ४७ वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आले. दुसरे मूत्रपिंड नागपूरच्या केअर हॉस्पिटलमधील ४४ वर्षीय महिला रुग्णाला तर यकृत नागपूर येथील एका खासगी रुग्णालयातील २८ वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आले. हे दोन्ही अवयव नागपुरात पोहचविण्यासाठी पोलीस उपआयुक्त (वाहतूक) चेतना तिडकेयांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी (मेघे) वर्धा ते नागपूर असे जवळपास ८८ किलोटमीटरचे ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले.