कोराडी (नागपूर) : कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्यावतीने लवकरच अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. येथील १६४ खोल्यांच्या भक्तनिवासात श्री महालक्ष्मी जगदंबा हार्ट, लंग्स ॲण्ड मल्टीऑर्गन ट्रान्सप्लॉंट हॉस्पिटल उभारले जाणार आहे. त्यासाठीचा इमारत हस्तांतरण सोहळा मंगळवारी पार पडला. यामाध्यमातून ऑर्गन ट्रान्सप्लॉंटची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष तथा भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात मंगळवारी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी व मंदिर संस्थानचे अध्यक्ष आ. बावनकुळे यांनी याबाबतच्या हस्तांरण करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी अप्पर आयुक्त अविनाश कातडे, अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर, कार्यकारी अभियंता कल्पना इखार, सहाय्यक अभियंता नेपाल भाजीपाले, वास्तूविशारद नीशिकांत भिवगडे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र टोकेकर उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, नागपूर मध्यभारतातील हेल्थकेअर हबकडे वाटचाल करीत आहे. तथापि, येथे ऑर्गन ट्रान्सप्लॉंटसाठी सुविधा नसल्याने रुग्णांना हैदराबाद, मुंबई व चेन्नईकडे जावे लागते. यात मोठा खर्च होत असल्याने हा उपचार अत्याधिक खार्चिक होता. त्यामुळे नागपूर येथे ऑर्गन ट्रान्सप्लॉंट सुविधा निर्माण व्हावी अशी मागणी होती. कोराडी संस्थानचे भक्तनिवास यासाठी देण्यात यावे अशी मागणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडे केली होती. त्याला प्रतिसाद मिळाला. आता भक्तनिवासाचे रुपांतर श्री महालक्ष्मी जगदंबा हार्ट, लंग्स ॲण्ड मल्टीऑर्गन ट्रान्सप्लॉंट हॉस्पीटलमध्ये होणार आहे.
सीएसआर फंडातून निधी उभारणार
या हॉस्पीटलच्या खर्चासाठी विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उभारला जाणार आहे. यामुळे माफक दरात नागपूरसह मध्य भारतातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळतीळ. सोबतच देशातील नामांकित शल्यचिकित्सकांचे मार्गदर्शन व सेवा वेळोवेळी मिळणार आहे. या हॉस्पीटलकरिता नागपूर येथील तज्ज्ञ शल्यचिकित्सक व संस्थानच्या निवडक संचालकांचे विश्वस्त मंडळ तयार करण्यात येणार आहे. विश्वस्त मंडळाद्वारे श्री महालक्ष्मी जगदंबा हार्ट, लंग्स ॲण्ड मल्टीऑर्गन ट्रान्सप्लॉंट हॉस्पीटल संचालित केले जाणार आहे.