‘ब्रेन डेड’दात्यांचे दोन वर्षात केवळ नऊच प्रत्यारोपण : उपराजधानीत ०.३ टक्केच सुमेध वाघमारे नागपूर उपराजधानीतील शासकीय रुग्णालयांमध्ये दर दिवशी एक तर संपूर्ण खासगी रुग्णालये मिळून एक असे दोन ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) रुग्णांची नोंद होते. या रुग्णांची माहिती शासनाच्या निर्देशानुसार विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला (डीटीसीसी) कळविणे बंधनकारक आहे, मात्र, गेल्या दोन वर्षांत केवळ नऊ ‘ब्रेन डेड’दात्यांचे अवयव प्रत्यारोपण झाले आहे. यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत यातना सहन करीत असलेले नागपुरातील २५० वर रुग्ण आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत असलेले नातेवाईक अडचणीत आले आहेत.मूत्रपिंड (किडनी), फुफ्फुस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, हृदयाच्या झडपा, आतडी, डोळे, कानाचे ड्रम, त्वचा हे मानवाच्या शरीरातील विविध अवयव दान करून एक मृत व्यक्ती इतर १० व्यक्तींना नवा जन्म देऊ शकतो. अवयव दानाला घेऊन जनजागृती होत असली तरी पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने उपराजधानीत अवयव दानाची चळवळ केवळ ०.३ टक्क्यांवरच थांबलेली आहे. राज्याच्या आरोग्य खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव टी.सी. बेंजामिन यांच्या स्वाक्षरीने ‘ह्युमन आॅर्गन ट्रान्सप्लांट’ कायदा १९९४ नुसार १३ सप्टेंबर २०१२ रोजी नव्या नियमांचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यात ब्रेन डेड झालेल्या रुग्णाची माहिती ‘डीटीसीसी’ला देणे बंधनकारक आहे. असे न केल्यास तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय नव्या आदेशात इस्पितळातील २५ खाटांचा नियम शिथिल करण्यात आला आहे. आता ज्या इस्पितळामध्ये अवयव प्रत्यारोपण केंद्रे नाहीत परंतु ज्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि शस्त्रक्रिया कक्ष आहे त्या ठिकाणी ‘नॉन आॅर्गन ट्रान्सप्लांट सेंटर’(एनओटीसी) म्हणून मान्यता देण्याची घोषणाही करण्यात आली. शहरातील आठ-दहा रुग्णालयांनी यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. परंतु वर्षभराचा कालावधी उलटूनही सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अनेक रुग्णालयांना परवानगी दिली नसल्याची माहिती आहे. यामुळे ‘ब्रेन डेड’ रुग्ण असला तरी त्याच्या नातेवाईकांचे समुपदेशन करून वेळीच अवयव काढणे अद्यापही शक्य झालेले नाही.
अवयव प्रत्यारोपणात उदासीनता
By admin | Published: May 15, 2016 2:48 AM